गेल्या दोन वर्षांपासून बहुसंख्य पातळ्यांवरील निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागलेल्या माजी मंत्री नारायण राणे यांच्या गटाला कुडाळ नगर पंचायत निवडणुकीतील निसटत्या विजयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या नगर पंचायतीच्या १७ जागांपैकी ९ जागा जिंकत राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. यापूर्वी खासदारकी आणि अन्य स्थानिक निवडणुकांमध्ये राणे गटाला पराभव पत्करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत तर खुद्द नारायण राणे यांना पराभवाची चव चाखावी लागली. या पाश्र्वभूमीवर झालेल्या कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवार निवडीपासून प्रचार यंत्रणेपर्यंत सर्व पातळ्यांवर स्वत: लक्ष घातले. तसे करताना भवतालच्या खुशमस्कऱ्यांना लांब ठेवले. त्यामुळे उमेदवार-मतदारांशी राणेंचा थेट संपर्क प्रस्थापित झाला. त्यांच्या उमेदवारांच्या विजयामध्ये हे महत्त्वाचे ठरले. दुसरीकडे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेनेने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. शिवाय, सेनेचे खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार वैभव नाईक आणि सावंतवाडीचे राज्यमंत्री असलेले दीपक केसरकर यांच्यातील समन्वयाचा अभाव राणेंच्या पथ्यावर पडला. मात्र या निवडणुकीत त्यांना काठावरील बहुमत असल्याने कारभार चालवताना सतत सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
एकेकाळी कोकणचे नेते मानले जाणारे नारायण राणे २०१४ च्या लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील पराभवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित झाले आहेत. त्यातही त्यांचे चिरंजीव नितेश यांना विधानसभेवर पाठवणारा कणकवली मतदार संघवगळता कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेने जिंकले आहेत. सावंतवाडी नगर परिषदेवर राज्यमंत्री केसरकरांची पकड आहे. मात्र वैभववाडी आणि दोडामार्ग या दोन नगर पंचायतींपाठोपाठ कुडाळ नगर पंचायतीवरही राणेंच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवरही राणेंचे वर्चस्व शाबूत आहे. हे चित्र लक्षात घेता जिल्ह्यातील भावी राजकारणाच्या दृष्टीने कुडाळचा विजय मोठा दिलासा देणारा आणि नवीन आशा पल्लवित करणारा ठरला आहे.