अनेक दिवसांपासून भाजपावर नाराज असलेले खासदार नारायण राणे यांचा भाजपाच्या जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकींचा जाहीरनामा बनवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वीस सदस्यांची समिती तयार करण्यात आली असून या जाहीरनामा समितीत महाराष्ट्रातून एकमेव नारायण राणे यांचा समावेश आहे. राजनाथ सिंह या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असतील.


भाजपापुरस्कृत खासदार असलेले नारायण राणेंनी गेल्या काही दिवसांपासून सतत भाजपावर टीका केली आहे. त्यानंतर त्यांनी पुढील निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढवण्याची घोषणा केली होती. शिवसेनेला युतीत घेतल्यास आम्ही एनडीएचा पाठिंबा काढून घेऊ असंही त्यांनी जाहीर केलं होतं. सध्या युतीचं काय होणार हे अजून गुलदस्त्यात असलं तरी भाजपाने मात्र आपल्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे यांना स्थान दिल्याने शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

भाजपाकडून जाहीरनामा समितीसोबतच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील समिती तयार करण्यात आली आहे. आठ सदस्यांची ही समिती असून त्यामध्ये अरुण जेटली, पीयूष गोयल, राज्यवर्धन राठोड या केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. तर इतर सामाजिक संघटनांना आपल्याकडे वळवण्यासाठी सामाजिक संस्था संपर्क समिती तयार करण्यात आली असून नितीन गडकरी यांच्यासमवेत 13 सदस्य या समितीत आहेत.