X

नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ‘एनडीए’त

नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची चिन्हे

नारायण राणे यांचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी झाला आहे. एनडीएत सहभागी झाल्याने नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची चिन्हे असून त्यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मंगळवारी रात्री नारायण राणे यांनी मुख्य्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी राणे यांना एनडीएत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करु असे नारायण राणे यांनी म्हटले होते.

शुक्रवारी दुपारी नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएत सहभागी होणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले. कोकणच्या विकासासाठी आम्ही एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाला आमच्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नारायण राणे एनडीएत सहभागी झाल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राणे हे महसूल खात्यासाठी आग्रही असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी तयार नसल्याची चर्चा आहे. राणे यांना सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास किंवा अन्य एखादे खाते दिले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. मात्र मंत्रिपदाविषयी अद्याप काही ठरलेले नाही, असे राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नारायण राणे एनडीएत गेल्याने आता शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राणे एनडीएत आल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरण्याची शक्यता आहे. राणेंचा वापर करुन शिवसेनेला शह देण्याची भाजपची खेळी आहे.राणे यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र सोडून तसे संकेतही दिले आहेत. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

First Published on: October 6, 2017 6:54 pm
Outbrain

Show comments