05 March 2021

News Flash

नगर जिल्ह्यात राणेंना साथ कठीणच!

राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा त्यांना नगर जिल्ह्य़ात तेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता.

नारायण राणे

नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेस पक्ष रिकामा करण्याची घोषणा केली असली तरी नगर जिल्ह्यतील कोणी मातबर नेता किंवा प्रमुख कार्यकर्ते राणे यांना साथ देण्याची शक्यता कमीच आहे.

राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली तेव्हा त्यांना नगर जिल्ह्य़ात तेवढा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचा जिल्ह्यत गट नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या गटात काँग्रेस विभागली आहे. पूर्वी ज्येष्ठ नेते कै. गोविंदराव आदिक व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मानणारा वर्ग होता. आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे कार्यकत्रे आहेत. पण राणे यांच्यासोबत कोणीही नाही.

राणे यांचे व्याही राजेंद्र निंबाळकर हे नगर जिल्ह्य़ातीलच आहेत. ज्येष्ठ नेते आबासाहेब निंबाळकर हे जिल्ह्यचे एक प्रभावशाली नेते होते. पण त्यांच्यानंतर राजेंद्र निंबाळकर हे राजकारणात असले तरी ते नगर जिल्हा बँकेच्या स्थानिक राजकारणापुरते सक्रिय आहेत. शिर्डी येथील त्यांचे काही मोजके कार्यकत्रे आहेत. त्यांच्यावर राणे यांची सारी मदार राहील.

नगरच्या राजकारणात माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव माजी आमदार शंकर गडाख यांनी राष्ट्रवादी सोडून स्वतंत्र पक्ष स्थापन केला. क्रांतिकारी शेतकरी पक्षात ते असून त्यांचे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, प्रहारचे बचू कडू यांच्याशी मत्रीचे संबध आहेत. राणे यांच्याबरोबर जाणे त्यांना अडचणीचे आहे, कारण त्यांचे विरोधक आमदार बाळासाहेब मुरकुटे हे भाजपात आहेत.

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे आता राष्ट्रवादीत असून नसल्यासारखे आहेत. त्यांचे भाजपचे नेते व पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी राजकीय सख्य आहे. भाजपबरोबर त्यांनी महाआघाडी करून नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढविल्या होत्या. ते थेट राणेबरोबर जाण्याची शक्यता कमी आहे. ते विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घेतील. पण राणे यांना छुपी साथ देण्याची भूमिका घेऊ शकतात.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याशी राणे यांची मत्री आहे. शिवसेना सोडल्यावर काँग्रेस प्रवेशासाठी बाळासाहेब विखे-पाटील यांनी आपली भेट घेतली होती, असे राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. विखे यांनी राणे यांना नेहमी राजकीय मदत केली. खासदार निलेश राणे अडचणीत आले तेव्हा विखे यांनी मदत केली होती.

पक्षात नेहमी विखे हे राणे यांना मदत करत आले. पण विखे हे आता काँग्रेस सोडल्यामुळे राणे यांना पूर्वीप्रमाणे मदत करू शकणार नाही. एकूणच राणे यांना नगर जिल्ह्यत काही हाताला लागणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2017 3:10 am

Web Title: narayan rane not get any support from congress leaders in ahmednagar
टॅग : Narayan Rane
Next Stories
1 शेट्टींना आव्हान देण्यासाठी सदाभाऊंचा ‘बहुजन’ प्रयोग!
2 एकदिलाने काम करा!
3 दाऊद स्वतःहून भारतात येईल असे वाटत नाही: आठवले
Just Now!
X