केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली . २४ ऑगस्टला रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप करत सडकून टीका केलीय.

या पत्रकार परिषदेत राणेंनी दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ९ जून २०२० रोजी मध्यरात्री बहुमजली इमारतीवरून पडून दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात युवा नेत्याचा हात असल्याचा दावा करत राणेंनी पुन्हा एकदा या प्रकरणावरून ठाकरे सरकरावर निशाणा साधला आहे. नाव न घेता ते म्हणाले, “दिशा सालियानचं कोणी केलं? कोण मंत्री उपस्थित होता? अद्याप या गोष्टीचा छडा का लागलेला नाही? पूजा चव्हाणचं देखील तेच… आता गप्प बसणार नाही… त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत पाठपुरावा करू ते ही लोकशाही पद्धतीने… कोर्टात जाऊ… पाहू कोण वाचवतंय?” असं म्हणत राणेंनी ठाकरे सरकारला धमकीवजा इशारा दिलाय.

आणखी वाचा: “मी असं काय बोललो होतो की राग आला”; नारायण राणेंचा सवाल

पुढे राणे म्हणाले, “ज्याने हे कृत्य केलं आहे, त्या प्रकरणात जे कुणी होते ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.” असं म्हणत जन आशीर्वाद यात्रा सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

९ जूनच्या मध्यरात्री बहुमजली इमारतीवरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. तर १४ जूनला सुशांत मृतावस्थेत आढळला. या दोन्ही घटनांमध्ये समान धागा असावा, असा तर्क सुरुवातीला काढण्यात येत होता.  दरम्यान, गेल्यावर्षी दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणे कुटुंबियांवर  टीका केली होती. यानंतर संतापलेल्या नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणाची मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी केली होती.

आणखी वाचा: “तुम्हालाही मुलंबाळं आहेत लक्षात ठेवा तुम्हाला मी…”; राणेंचं सुचक वक्तव्य

दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर हे आरोप केले होते

उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी ट्वीट  करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केेले होते. “दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे असेल तर  त्या दिशा सालियानच्या केसची मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं.