अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं होतं. मात्र, भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. पार्थ १८ वर्षांचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवली आहे. तो परिपक्वच आहे,” अशी भूमिका राणे यांनी मांडली.

नारायण राणे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासह पार्थ पवार यांच्याबद्दल भाष्य केलं. पार्थ पवार यांच्याबद्दल बोलताना खासदार राणे म्हणाले, “पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. तो राजकारणात आहे. त्याशिवाय त्याने निवडणुकही लढवली आहे. त्यामुळे तो परिपक्वच आहे. पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्याने हे विधान केलं असेल,” असं म्हणत राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये यावरून संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अनेकांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीसंदर्भात बोलताना शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं. “पार्थ पवार इमॅच्युअर आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही,” अशा शब्दात शरद पवार यांनी फटकारलं होतं. तेव्हापासून पार्थ पवार नाराज असल्याची चर्चा आहे.