भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी राज्यातील सत्ता वर्तुळात खळबळ उडवणारा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेच्या ५६ पैकी ३५ आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अकार्यक्षम आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा राज्यात सत्ता स्थापन करेल, असा दावा राणे यांनी केला आहे.

एका कार्यक्रमानिमित्त नारायण राणे ठाण्यामध्ये आले होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नारायण राणे म्हणाले, “सरकार कसं चालवायचं हेच त्यांना माहिती नाही. त्यामुळे अशा सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या? सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी पाच आठवडे घेतले. त्यामुळे ते सरकार कसं चालवणार हे दिसून येतं,” असं राणे म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं वचन दिलं होतं, ते पोकळ ठरलं आहे. त्याचबरोबर या कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार हेही माहिती नाही. ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. पण, मराठवाड्यासाठी कोणत्याही निधीची अथवा योजनेची घोषणा न करता परत आले. सध्या शिवसेनेच्या ५६ पैकी ३५ आमदार उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. भाजपाचे १०५ आमदार असून, शिवसेनेचे ३५ आमदार नाराज आहेत,” असं सांगत राणे यांना पुन्हा भाजपाची सत्ता येणार असल्याचं संकेत दिले.

भाजपा-मनसे युतीवर मौन –

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावरून भाजपा मनसे एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. भाजपा आणि मनसेच्या युतीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर मात्र, नारायण राणे मौन बाळगले. या युतीविषयी भाजपाचे प्रमुख बोलतील, असं राणे यांनी सांगितलं.