14 December 2019

News Flash

तो पराभव कधीही विसरणार नाही- नारायण राणे

सहा वेळा आमदार राहिलेल्या मतदारसंघातच पराभव स्वीकारावा लागला.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव माजी मुख्यमंत्री नारायण राणे अजूनही विसरले नाही. नवख्या उमेदवाराने केलेल्या पराभवाची सल अजूनही राणे यांना बोचत असून ती त्यांनी बोलून दाखवली. मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या माझ्यासारख्याला मागच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. तो मी कधीही विसरणार नाही, अशी खंत नारायण राणे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली.

मालवणमध्ये राणे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राणे यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची सल कार्यकर्त्यांसमोर मांडली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून यशस्वी झालो. याच मतदारसंघातून सहा वेळा आमदार झालो. मात्र, सहा वेळा आमदार राहिलेल्या मतदारसंघातच पराभव स्वीकारावा लागला. वैभव नाईक यांच्याकडून झालेला पराभव मी कधीही विसरू शकणार नाही, असे राणे म्हणाले.

मालवणबद्दल मला आदर आहेच. पण गेल्या पाच वर्षात आपला आमदार, खासदार नाही. मी राज्यसभेवर आहे असे का झाले, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी राणे यांनी १९९० पासून मिळणाऱ्या मतांची टक्केवारीही कार्यकर्त्यांसमोर मांडली. १९९० पासून मला ८० टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य मिळत होते. गेल्यावेळी नीलेश राणे यांना ३५ टक्के मते कमी मिळाली आहे. मालवणला मागासलेले ठेवायचे नसेल तर आगामी निवडणुकीत मला ८० ते ८५ टक्के मतदान व्हायला हवे, त्यासाठी तातडीने कामाला लागा, असे आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान, १६ ऑगस्टला मुंबईत राणे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार असून, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहे, याची माहिती यावेळी राणे यांनी दिली.

First Published on August 14, 2019 8:03 am

Web Title: narayan rane says i will never forget defeat in last election bmh 90
Just Now!
X