आणखी एका कारवाईला जाण्याची तयारी ठेवावी असे सांगत मोदी सरकारचा हुकूमशाही पध्दतीने कारभार सुरू आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी सांगलीत पत्रकार बैठकीत केली. तर, शेती उत्पन्न आयकराच्या कक्षेत आणण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी याच पत्रकार बैठकीत केला.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा प्रारंभ करण्यासाठी काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते सांगलीत आले होते. या वेळी डॉ. पतंगराव कदम यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार बैठकीत राणे बोलत होते. या वेळी राणे म्हणाले की, सामान्य माणूस भाजीपाला खरेदीसाठी हैराण झाला असताना, शासन मात्र त्याच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करून शासकीय देणी वसुलीसाठी जुने चलन स्वीकारण्याची तयारी दर्शवित आहेत. वसंतदादांनी पाणी अडवा, पाणी जिरवा ही घोषणा केली, मात्र सध्याचे सरकार पैसा अडवा, विरोधकांची जिरवा या पध्दतीने वागत आहे. मोदी सरकार आणखी एक कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असे सांगत आहे हा प्रकार म्हणजे हुकूमशाही वृत्तीच म्हणावी लागेल. विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असल्याची माहिती मिळाली असून पक्षहिताबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत यावर उपाय शोधला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले. यावेळी पत्रकार बैठकीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.