रत्नागिरी : कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारामतीमध्ये जाऊन शरद पवार यांना विचारावे लागते. त्यामुळे ते केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत,  अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.  रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या प्रचारासाठी राणे रत्नागिरीत आले आहेत.

त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भाजपची देशात सत्ता आहे. शहराच्या विकासासाठीचा निधी मी दिल्लीतून आणू शकतो. राज्याकडे निधी देण्याची क्षमताच उरलेली नाही. ज्या सरकारची क्षमता कर्जमाफी देण्याची नाही, ते शहर विकासाला निधी उपलब्ध करू  शकत नाहीत. त्यातूनही मुख्यमंत्र्यांना काही करायचे झाल्यास आधी बारामतीत जाऊन शरद पवार यांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे हे मुख्यमंत्री नामधारी आहेत.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या वतीने शरद पवार आणि जयंत पाटील देतात. ज्यांना राज्याची माहिती नाही, असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा विकास कसा करणार, हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली; परंतु ती दिली नाही. त्यासाठी तरतूदही नाही. त्याची रक्कम किंवा लाभार्थीही सरकार जाहीर करत नाही. फक्त घोषणाबाजी करून, फलक लावून जनतेची फसवणूक सुरू आहे.

कोकणाच्या विकासाबाबत राणे म्हणाले की, ज्या कोकणाने शिवसेनेच्या मागे उभे राहणे पसंत केले, त्या कोकणाला पुरवणी अंदाजपत्रकात स्थान नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करतात आणि तेच बंद पाडण्यासाठी पुढे सरसावतात. रत्नागिरीतील वाटद एमआयडीसीबाबत तशीच परिस्थिती झाली आहे. रत्नागिरी शहराला इतिहास आहे, मात्र अपेक्षित परिवर्तन झाले नाही. कारखानदारी, व्यापार, नागरिक सुविधा नाहीत. रत्नागिरी पालिकेसह शिवसेनेच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषदही डब्यात गेली आहे. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, भुयारी गटारे नाहीत. उघडय़ा गटारांमुळे रोगराई पसरली आहे. भ्रष्टाचार सोडून पालिकेने काहीच केलेले नाही. फक्त पालिकेचा कारभार हाकणारे धनाढय़ झाले.

ठाकरे यांनी भ्रष्टाचाराबद्दल काहीच बोलू नये. त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा मी स्वत: वाचेन. मुंबईतील मेट्रोपासून मोठय़ा कामांना स्थगिती देण्यामागेही भ्रष्टाचारच आहे. कंत्राटदार धावत आपल्यापर्यंत यावेत यासाठी हे सर्व काही चालले आहे, असाही आरोप राणे यांनी केला.