नागपूर : राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारून उद्धव ठाकरे यांना एक महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. निवडक सहा मंत्र्यांचा अपवाद वगळता अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. महाआघाडीच्या सर्व घटक पक्षांतील प्रत्येकाची मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या काळात काहीही घडू शकते. अद्याप घोडेबाजार संपला नाही, असे सूचक वक्तव्य भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत  केले.

उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाला मूठमाती दिली. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरकार स्थापन झाल्यावरही एकवाक्यता नाही. त्यामुळे हे सरकार सहा महिन्यांहून अधिक काळ चालणार नाही, असे राणे म्हणाले. शिवसेनेला १४ ते १५ हून अधिक मंत्रिपदे मिळणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही अवस्था सारखी आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या तिन्ही पक्षांत मोठी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर नाराजी उफाळून येईल. सत्ताधारी पक्षातील आमदारच विरोधी पक्षातील नेत्यांना मंत्रिपद देता की पैसे? अशी विचारणा करतात. त्यामुळे अद्यापही घोडेबाजार सुरू असल्याचे राणे म्हणाले. सत्तेसाठी घोडेबाजार करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, ‘‘फडणवीस करणार नाही, पण पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर बहुमतासाठी आमदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी दिली होती. ती पूर्ण करण्याचे अद्यापही प्रयत्न सुरू आहेत.’’

हे सरकार केवळ विकासकामांना स्थगिती देत आहे. कंत्राटदारांशी वाटाघाटी करण्याचा हा भ्रष्ट मार्ग आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी निम्न दर्जाची होती. आश्वासनावर ते काहीच बोलले नाही. त्यांना सभागृहातील परंपराही माहिती नाही. त्यांनी हेक्टरी २५ हजार मदतीचे आश्वासन पाळावे, असे राणे म्हणाले. सावरकरांबद्दल राहुल गांधी यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले.

मुख्यमंत्रिपदी  शिवसैनिकाला बसवणार, असे उद्धव म्हणाले होते; पण तेच मुख्यमंत्री झाले. ही शिवसैनिकांची फसवणूक आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी फक्त खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेच गेले. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांचे नाव पवार यांनी पुढे करावे, असे ठरल्याचा दावा राणे यांनी केला. मुख्यमंत्रिपदाचे आमिष देऊन एका नेत्याला आमदार थांबलेल्या हॉटेलचे देयक चुकते करायला लावले, असा गौप्यस्फोट या वेळी राणे यांनी केला.