तौते चक्रीवादळाच्या पाहणीकरता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कोकण दौऱ्यावरुन त्यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांचंही नाव आता त्यात जोडलं गेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे नौटंकी दौरा असल्याची टीका राणे यांनी केली आहे.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवर अनेक आरोप करत त्यांच्या कारभाराचे धिंडवडे काढले. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली…किती वेळ? फक्त तीन तास…तीन तासाचा हा दौरा केला. दोन दिवसांत भरपाई देणार म्हणाले..दिली का? का नाही दिली अजून…
भरपाईची ठोस रक्कम अजूनही का जाहीर केलेली नाही? असे अनेक सवाल राणेंनी या सरकारवर उपस्थित केले आहेत.

आणखी वाचा- करोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार, नारायण राणेंचा गंभीर आरोप

आधी मागची द्या मग आत्ताची बघू..मागचीच भरपाई अजून दिली नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. वादळ संपल्यावर यांनी दौरा केल्याची टीकाही त्यांनी केली. या सरकारला नैसर्गिक आपत्तीबद्दल काहीच माहिती नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

दरम्यान, विरोधी पक्षांनीही मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर जोरदार टीका केली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणतात, या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालावरुन राज्य सरकारला काही द्यायचंच नाही असं दिसून येत आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये ह्या अहवालातली नुकसानाची आकडेवारी जाहीर केली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणतात, “कोकण विभागीय आयुक्तांकडून तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.”