नारायण राणे यांची सूचना; महिला काँग्रेस शिबिराचा समारोप
काँग्रेस पक्षाची देशात व राज्यात असलेली सत्ता का गेली, याचा विचार करा. पुन्हा देशात व राज्यात काँग्रेस पक्षाला सत्ता कशी मिळेल यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे आवाहन करतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी, समाजसेवा व विकासकामे केली तरच पक्ष सत्तेत येईल, असा विश्वासही व्यक्त केला.
शिर्डी येथे आयोजित केलेल्या प्रदेश महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या ‘उडान शिबिरा’च्या समारोपप्रसंगी राणे बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा होत्या. या वेळी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस उपस्थित होत्या.
राज्यातील युती सरकारवर टीका करून सत्ताबदल होणार नाही, त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. त्यांनी सामाजिक, विधायक दृष्टिकोनातून काम केले तरच राज्यात सत्ताबदल होईल. कपडे व दागिने कार्यात मोजले जात नाही. समाजसेवा व विकासकामे कार्यात मोजली जातात, यातूनच पक्ष सत्तेवर येतो असे स्पष्ट करून राणे पुढे म्हणाले की, महिलांचे सबलीकरण करण्यासाठी काँग्रेसने अनेक योजना आणल्या. महिला आरक्षणाचे विधेयक सोनिया गांधींनी आणले. देशातील व राज्यातील सरकारने महिलांसाठी एकही योजना न आणता पूर्वीच्याच योजनांची नावे बदलण्यात येऊन केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करीत आहे असा आरोप केला.