नारायण राणे यांच्या पराभवाच्या धक्क्यातून त्यांचे समर्थक बाहेर पडायला तयार नाहीत. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा परिषद माजी सदस्य विकास कुडाळकर अशा अनेकांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. तसेच अनेक जण राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. नारायण राणे यांनी गेल्या २५ वर्षांच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राजकारणात एक फळी निर्माण केली आहे. राणेंच्या जिवावर अनेक जण श्रीमंत झाले आहेत. जीवनातील आर्थिक कायापालट करणारी मोठी टीम जिल्ह्य़ात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोटय़ा सावंत यांची राजकीय हद्दपारी झाल्याने प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्षपद उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या रणजीत देसाई यांच्याकडे आले आहे, पण त्यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात जिल्हा परिषद विषय समिती सभापतिपद निवडणूक जाहीर झाली, पण काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला नसल्याने विषय समिती सभापतिपदे रिक्तच राहिली आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणारे रणजीत देसाई यांनीच जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला असल्याने पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राणे यांचा पराभव झाला त्या कुडाळ तालुक्यात रणजीत देसाई राहत असल्याने त्यांनी राजीनामा पक्षाकडे दिला आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेसला पूर्ण बहुमत असतानाच नारायण राणे यांचा पराभव शक्य नव्हता पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदारांनी धक्यावर धक्के दिले आहेत. नारायण राणे यांची राज्याच्या राजकारणात प्रत्येकाला गरज वाटत होती, पण मतदारराजाने तरुण तडफदार वैभव नाईक यांना आमदार केले. राणे यांना टपाली मतदानातही बहुमत मिळविता आले नाही. त्यामुळे काँग्रेसला यापुढे जनता व शासकीय यंत्रणेमध्ये प्रतिमा सुधारावी लागणार आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर व कुडाळचे आमदार म्हणून वैभव नाईक यांना लोकांनी स्वीकारले. तिकडे कणकवली मतदारसंघात राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांना आमदारकीची संधी देऊन स्वप्न साकारण्यासाठी तरुणाला साथ दिली आहे. त्यामुळे यापुढे आ. नितेश राणे यांचा राजकारणात उदय होईल असे बोलले जात आहे.
नितेश राणे हे स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून दाखविलेले विकासाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आमदारकीचा फायदा उठवतील, पण राज्याच्या राजकारणात नारायण राणे यांची उणीव मात्र भासण्याची शक्यता आहे. पण काँग्रेस पक्ष नारायण राणे यांना संधी देऊन कोकण विभागात पक्षाला ताकद मिळवून देईल असे अनेकांना वाटते.
नारायण राणे पराभवाने खचून जाणारे नेते नाहीत. त्यांना पराभवाची काही काळ खंत वाटेल, पण पुन्हा राजकारणात सक्रिय होत, सिंधुदुर्गचा गड सावरण्यासाठी प्रयत्न करतील. आता त्यांना पक्ष संघटना नव्या दमाच्या तरुणांना घेऊन बांधण्याचा प्रयत्न करावा लागेल. आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांना उभारी देण्यासाठी निश्चितच राणे जिल्ह्य़ात सक्रिय होतील, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. सिंधुदुर्गचे राजकारण आणि नारायण राणे हे गेल्या २५ वर्षांचे समीकरण होऊन बसले होते. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना दु:ख होणारच आहे. राणेंनी राजकारणात तरुणांची फौज तयार केली, तशी अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला करता आली नाही. त्यामुळे राणे यांच्यासारख्या नेतृत्वाला नक्कीच काँग्रेस उभारी देईल अशी अपेक्षा आहे.