मी लवकरच मंत्री असेन असे सूचक वक्तव्य ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नुकतेच केले. मीही या गोष्टीच्या प्रतिक्षेत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी एनडीएमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपकडून त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला नाही. राणे नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घेऊ असा शब्द मुखमंत्र्यांनी आपल्याला दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठवाड्याकडे १३ वर्ष मुख्यमंत्रीपद असूनदेखील मराठवाड्याचा विकास झाला नाही. मराठवाड्याच दरडोई उत्पन्न कमालीचं खालवले आहे. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री पद भूषवले मात्र नांदेडचे दरडोई उत्पन्न वाढलं नाही. सिंधुदुर्ग जिल्हाचे उत्पन्न तर जास्त आहेच मात्र जिल्हा टँकरमुक्त आहे. मराठवाड्यात अशा पद्धतीने कोणताच विचार केला गेला नाही असा टोला लगावत आपण मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी मुखांत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पन्नास वर्षे सत्तेत असणे आणि चार वर्ष सत्तेत यात फरक असून शेतकरी धोरणाबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी बोलतो ते करतो अस म्हणत मराठा आणि मुस्लिम आरक्षणसंदर्भात भाजपा सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद असल्याने आपण एनडीएमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सोडल्यानंतर महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांपेक्षा वेगळे आणि भारतीय घटनेशी प्रामाणिक राहून जनतेसाठी काम करता यावं म्हणून मी वेगळ्या पक्षाची स्थापना केली असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. पक्षाला आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर कार्यकारणीची निवड केली जाणार असून येणाऱ्या सर्व निवडणूक पक्ष लढविणार असल्याचंही राणे यांनी सांगितलं.