मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपासंदर्भात जामीनावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे. नारायण राणे हे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून ते पावणेबाराच्या सुमारास अलिबागच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

नक्की वाचा >> “थोबाडीत मारली तरी…”; चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधक, सत्ताधारी पुन्हा आमने-सामने

नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी आज सकाळी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भातील माहिती दिली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी अटक झाल्याच्या दिवशीच रात्री जामीन मंजूर करताना महिन्यात दोनवेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. मात्र मागील वेळेस नारायण राणे यांनी प्रकृतीचं कारण देत हजेरी लावली नव्हती. आज मात्र नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर पहिल्यांदात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत. दरम्यान आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जामीन नोंदवला जणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नारायण राणे आज अलिबागमध्ये येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

अटक आणि सुटका…

नारायण राणे हे आज अलिबागमध्ये स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावणार असून तिथेच त्यांचा जामीन नोंदवून घेतला जाणार आहे. २३ ऑगस्ट रोजी कोकणामधील आपल्या जन-आशिर्वाद यात्रेनंतर पत्रकारांशी बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कानाखाली मारण्याची भाषा केली होती. त्याच प्रकरणामध्ये त्यांना २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची कोकण विभागीय जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास चिपळूणहून संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे पोहोचली. तेथील गोळवलकर गुरुजी स्मारकामध्ये कार्यक्रम आटोपून अल्पोपहार सुरू असतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आपल्या ताफ्यासह तिथे दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

नक्की वाचा >> ‘राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, कितीही हवा भरली तरी…’; शिवसेनेचा हल्लाबोल

नक्की वाचा >> “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..”; संजय राऊत संतापले

अटक होऊ  नये, अशी मागणी करणारा राणे यांचा अर्ज रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. जनआशीर्वाद यात्रेत स्वत: राणेंसह त्यांचे चिरंजीव नितेश, नीलेश, आमदार प्रसाद लाड, यात्रेचे कोकण विभागीयप्रमुख प्रमोद जठार इत्यादींनी कारवाईसाठी आवश्यक कागदपत्रे दाखवण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करत तिथेच ठिय्या मांडला. अटक वॉरंट दाखवले नाही तर तिथून न हलण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिथे प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अखेर पोलीस अधीक्षक गर्ग यांनी राणे यांची समजूत काढून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले आणि तिथे महाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

नक्की वाचा >> रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

राणे यांना रात्री साडेआठच्या सुमारास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रथमवर्ग दंडाधिकारी बाबासाहेब शेखपाटील यांच्यापुढे  हजर करण्यात आले. यावेळी राणे यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, राणे यांना अटक करण्यापूर्वी नोटीस दिली नाही, अटक चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणे यांची जामिनावर सुटका केली होती.

नक्की वाचा >> “फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”; शिवसेनेनं साधला निशाणा

राणे काय बोलले होते?

भाजपतर्फे राज्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरू आहेत. त्यापैकी कोकण विभागाची यात्रा १९ ऑगस्टला मुंबईहून सुरू झाली. २३ ऑगस्ट रोजी ही यात्रा महाडमध्ये आली असता तेथील पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा संदर्भ दिला. ‘‘यंदाचा स्वातंत्र्यदिन हीरक महोत्सव की अमृत महोत्सव, अशी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली तेव्हा मी त्या ठिकाणी असतो, तर कानाखाली चढवली असती’’, असे आक्षेपार्ह विधान राणे यांनी केले होते. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. नाशिक, पुणे व महाड या तीन ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राणेंविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर दिवसभर पडसाद उमटले आणि पुढील अटकनाटय़ घडले होते.