मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावात जाऊन सरकारच्या अपयशाचा पाढा वाचणार असल्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी जाहीर केले. सरकार कोणाचेही असू द्या, कोकणावर अन्याय सहन केला जाणार नाही. सिंधुदुर्गच्या रस्त्यावर मंत्र्याची गाडी फिरू देणार नाही, असा इशारा देतानाच राणे यांनी शिवसेना मंत्रिपदासाठी लाचार असल्यानेच बिनकामाची मंत्रिपदे घेऊन सत्तेत घुसली, अशी त्यांनी टीका केली.
सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेस नेते नारायण राणे यांनी भाजप-शिवसेना सरकारवर टीका केली. शिवसेनेवर जहरी टीका करतानाच राज्यमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांचे नाव टाळत समाचार घेतला. राज्यमंत्री बिनकामाचे आहेत, अशी टीका करून विधानसभेत अद्यापि उभा राहून बोलत नाही तो आमदार वृत्तपत्रांना मुलाखती देत सुटला असल्याचे वैभव नाईक यांचे नाव टाळत नारायण राणे यांनी समाचार घेतला.
या वेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, सभापती प्रमोद सावंत, तालुका अध्यक्ष संजू परब, मनीष दळवी, बाळा गावडे, संदीप कुडतडकर आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे गौराग रेगे यांच्यासह सहकाऱ्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेस प्रवेश केला. त्यावर नारायण राणे यांनी काँग्रेसची विचारधारा, आमचे काम लोकांच्या मनात आहे. सत्ता येऊनही शिवसेनेचे पदाधिकारी प्रवेश करत आहेत, त्यांना पटले अच्छे दिन आता येणार नाही आहेत, असे राणे म्हणाले.
जबाबदारीचे भान ठेवून काम करा. एखादा पराभव झाला म्हणून खचून जाऊ नका, असे सांगताना नारायण राणे म्हणाले, खेळ आणि निवडणुकांत फरक नसतो. जय जयच असतो व हार हारच असते, त्यामुळे हार स्वीकारून आत्मपरीक्षण करा. पक्षाचे नुकसान म्हणजेच आपले नुकसान समजून यापुढे काम करा, असे राणे यांनी आवाहन केले.
माझा कार्यकर्ता धगधगत्या निखाऱ्यासारखा असावा, असे सांगत राणे म्हणाले, सावंतवाडीतील वीजतारा दुर्दैवी प्रसंगाबाबत प्रधान सचिवांना मी संपर्क साधून नुकसानभरपाई व वीजतारा बदलण्याची मागणी करताच काम सुरू झाले. राज्यमंत्र्याने काही केले नाही किंवा त्याला काहीच अधिकार नाही, असे दीपक केसरकरवर टीका करताना राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विकासाच्या भविष्याबाबत मला चिंता आहे. या जिल्ह्य़ाचा विकास, जिल्ह्य़ाचे प्रश्न कसे सुटणार? प्रकल्पाचे काय होणार? याबाबत चिंता आहे. राज्यमंत्रिपद मिळाले असले तरी त्यांना अधिकार नाहीत, असे नारायण राणे यांनी सांगून यापुढे सिंधुदुर्गात संघटना बळकट करून गोरगरिबांच्या सेवेस कटिबद्ध राहणार आहे, असे राणे म्हणाले.
अन्यायाच्या विरोधात जशास तसे उत्तर द्या, मला चमचेगिरी करणारे कार्यकर्ते नको, असे सांगत मुंबई महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही, पण शिवसेना शेळपट असल्यानेच महाराष्ट्र तोडणाऱ्या भाजपसोबत गेली. मंत्रिपदासाठी लाचार बनली, असे सांगत भाजपमध्ये जाणाऱ्यांना जाऊ द्या, तुम्ही निष्ठा राखून प्रामाणिकपणे काँग्रेससोबत राहा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले.
या वेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, बाळा गावडे, संदीप कुडतरकर, अंकुश जाधव, गुरुनाथ पेडणेकर आदींनी विचार मांडले. या वेळी प्रास्ताविक अन्वर खान, तर आभारप्रदर्शन म्हापसेकर यांनी केले.