रत्नागिरी : शिवसेनेचे आमदार येथे तीन तीनदा निवडून येऊनही गेल्या पंधरा वर्षांत येथे कोणती कामे झालेली नाहीत. विकास झाला नाही, तरीही दादागिरी सुरू आहे. पण तुम्ही राणेंच्या नादाला लागू नका. आमच्यासमोर गुंड नाचवू नका, तुमचे नाचणे बंद करून टाकेन, असा थेट इशारा खासदार नारायण राणे यांनी आमदार उदय सामंत यांना दिला.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील बाबू पाटील, संतोष निबाळकर, वरवडेचे सरपंच निखिल बोरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राणे यांच्या उपस्थितीत रविवारी स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे, प्रभारी राजन देसाई, जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

काही महिन्यांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आमदार सामंत यांच्या समर्थकांनी ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांला मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद त्यानंतरही शहरात उमटले. राणे यांचे चिरंजीव माजी खासदार नीलेश यांनीही वेळोवेळी आमदार सामंत यांच्यावर आक्रमकपणे टीका केली आहे. तो धागा पकडून खासदार राणे म्हणाले की, मी नीलेशच्या पाठीशी उभा आहे. त्याला मी काहीच सांगणार नाही. आमदारांनी या फंदात पडू नये. राजकारण विधायक, सामाजिक विकासाचे भान ठेवून करा. जनता ‘उदय’ करते आणि ‘अस्त’ही करू शकते, असा टोलाही राणे यांनी लगावला.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना जन्माला आली. मात्र मराठी माणूस हद्दपार झाला आहे. आता फक्त अठरा टक्के मराठी माणूस मुंबईत शिल्लक आहे. सत्तेत आहेत, पण मराठी माणसाच्या रोजगारासाठी किंवा न्याय्य हक्कासाठी शिवसेनेने काय केले? उन्नती केवळ ‘मातोश्री’ची झाली, अशी टीका सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता करून राणे पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरी शिवसेना राम मंदिराचा प्रश्न हाती घेते. लोक रडताहेत, आत्महत्या करताहेत आणि उद्धव ठाकरे राम मंदिर बांधायला निघाले आहेत. आता ते पंढरपूरला जाऊन पोचले. उद्या तिरुपतीला जातील.

 शिवसेना युती करणार

राज्यातील सध्याच्या परिस्थितीला भाजपवर टीका करणारी शिवसेनाही तेवढीच जबाबदार आहे, असे मत व्यक्त करून खासदार राणे म्हणाले की, युती करणार नाही, असे म्हणतात. पण शिवसेना युती केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेने युतीबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी. ते युती करणार, कारण त्यांना सत्तेची चव लागली आहे. ते लाथ मारल्याशिवाय बाहेर जाणार नाहीत. त्यांचीच पिलावळ असलेले रत्नागिरीचे आमदार मंत्री व्हायला गेले आणि बांद्रय़ात महामंडळ घेऊन बसले आहेत.

पक्षामध्ये प्रवेश केलेल्या बाबू पाटील आणि इतर कार्यकर्त्यांना धीर देताना राणे म्हणाले की, तुम्ही आजपासून कामाला सुरुवात करा. तुमचा पाण्याचा प्रश्न उद्या मार्गी लागेल.

पाणी न देणे हे पाप आहे. हा गुन्हा आहे. पाणी बंद झाले तर आमदाराच्या घरावर मोर्चा जाईल आणि त्यांच्या घरातील पाणी गावात जाईल. मी येथे समज द्यायला आलो आहे, असेही त्यांनी बजावले. आपल्या पक्षाचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपशी बोलणे सुरू आहे. पुढे काय होईल, माहिती नाही. पण तुम्ही ‘स्वाभिमान’च्या मागे उभे राहा. पक्षाच्या वतीने जो उमेदवार देऊ तो तुमच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारा असा असेल. आता कामाला लागा, असे आवाहनही राणे यांनी केले.

दरम्यान मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार नीलेश ठरवतील, असे खासदार राणे यांनी जाहीर केले. तसेच भाजपच्या केंद्रीय जाहीरनामा समितीवर झालेल्या निवडीबाबत फार उत्साही प्रतिक्रिया दिली नाही.

मी याची माहिती घेतो, असे सांगून त्यांनी विषय संपवला. निवडणुकीनंतर भाजपची स्थिती भक्कम राहील. त्यामुळे त्यांना कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही, असे भाकीतही खासदार राणे यांनी वर्तवले.