केंद्रीय मंत्री नारायण राणे परवापासून महाराष्ट्रातील अर्धवट राहिलेली त्यांची ‘जन आशीर्वाद यात्रा’ पुन्हा सुरू करणार आहेत. गेल्या दोन दिवसांच्या राजकीय घडामोडींनंतर राणेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी सिंधुदुर्गमधून पुन्हा यात्रेला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राणे यांच्या दौऱ्याचा मार्ग पूर्वी होता तोच असणार आहे.

नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार होता. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.

नारायण राणेंचं नेमकं वक्तव्य..

नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.