अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेल्या अमोल काळेची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती सीबीआयच्या वतीने न्यायालयात देण्यात आली होती. सीबीआयने अमोल काळेला ताब्यात घेतले होते. न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत त्याला सीबीआय कोठडी सुनावली होती.

शुक्रवारी अमोल काळेला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अमोल काळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गौरी लंकेश – दाभोलकर हत्याप्रकरणाचे कनेक्शन
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाकडून अटक करण्यात आलेले आरोपी राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांनाही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. बंगेरा कर्नाटक शासनाच्या सेवेत होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना बंगेराने कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे, असा आरोप आहे.