महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला सीबीआयने अटक केली होती. त्याच्या चौकशीतून सचिन अंदुरे, शरद कळसकर, अमित दिगवेकर, अमोल काळे, राजेश बंगेरा ही नावे समोर आली. यातील चौघांना सीबीआयने ऑगस्टमध्ये अटक केली होती. या सर्वांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमाअंतर्गत (यूएपीए) कारवाई करण्याबाबत सीबीआयने काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता.

शनिवारी न्यायालयातील सुनावणीदरम्यान सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर याच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली. मात्र, न्यायालयाने सीबीआयला ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुरुवातीला इचलकरंजीतील बेकायदा शस्त्र विक्री करणारा मनीष नागोरी आणि त्याचा साथीदार खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात त्यांच्याविरोधात पुरावे न आढळल्याने पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले नाही. शेवटी न्यायालयाकडून दोघांनाही या गुन्ह्यातून वगळण्यात आले.