डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेचा जामीन अर्ज पुण्यातील न्यायालयाने फेटाळून लावला. याप्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑक्टोबररोजी होणार आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती. या हत्येचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवण्यात आल्यानंतर ९ मे २०१४ रोजी मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. या हत्येमागे हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा आरोप असून २०१४ साली गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या ‘सनातन’च्या समीर गायकवाडच्या चौकशीतूनही दाभोलकर हत्येविषयी काही धागेदोरे मिळतात का, या दिशेने तपास सुरु होता. शेवटी सीबीआयने तीन वर्षांनी म्हणजेच जून २०१६ मध्ये या प्रकरणात वीरेंद्र तावडेला मुंबईत अटक केली. तावडे हा २००९ पासून फरार असलेला सनातनचा साधक सारंग अकोलकरच्या संपर्कात होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलशी सार्धम्य असणारी मोटारसायकल वीरेंद्र तावडे याच्याकडे सापडली होती, असे सीबीआयचे म्हणणे होते.

वीरेंद्र तावडेने पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. गुरुवारी झालेल्या सुनावणीत तावडेचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.