11 November 2019

News Flash

अ‍ॅड. पुनाळेकर, भावे यांना सीबीआय कोठडी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना रविवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी १ जूनपर्यंत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींकडून बाजू मांडणारे अ‍ॅड. पुनाळेकर आणि त्यांच्याकडे कामाला असलेला लिपिक भावे याला  शनिवारी सीबीआयने अटक केली. त्यानंतर त्यांना सीबीआयच्या पथकाने रविवारी दुपारी पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाच्या आवारात कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अ‍ॅड. पुनाळेकर यांनी न्यायालयात स्वत: बाजू मांडून या प्रकरणात सीबीआय मला गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ‘‘कर्नाटक पोलिसांनी कळसकरला बेंगळुरूतील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो अटकेत आहे. त्याने कर्नाटक पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या आधारे मला अटक करण्यात आली. मी त्याला वकील म्हणून भेटलो होतो. मी त्याला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला, असा अर्थ सीबीआयने त्याने दिलेल्या जबाबातून काढला. त्याआधारे मला अटक करण्यात आली. मी गेल्या वर्षी कळसकरला डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आली, तेव्हापासून त्याची बाजू मांडत आहे.’’

‘‘ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विक्रम भावेला अटक करण्यात आली होती. तो पाच वर्षे कारागृहात होता. कारागृहातून सुटल्यानंतर मी त्याला माझ्याकडे लिपिक म्हणून काम दिले,’’ असे अ‍ॅड. पुनाळेकर यांनी युक्तिवादात सांगितले. अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्यावतीने अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली. सीबीआयकडून करण्यात आलेली कारवाई चुकीची आहे, असे त्यांनी युक्तिवादात नमूद केले.

बचाव पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेले मुद्दे सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी खोडून काढले. शरद कळसकरने मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या कार्यालयात गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांची भेट घेतली. त्या वेळी तेथे भावे होता. अ‍ॅड. पुनाळेकर यांनी कळसकरला हत्या प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर  कळसकरने ठाण्यातील खाडी पुलावरून पिस्तूल पाण्यात फेकून दिल्याचे उघड झाले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने दोघांना सीबीआय कोठडी देण्याची विनंती अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केली. दरम्यान, अ‍ॅड. पुनाळेकर यांनी नवी मुंबईतील सीबीआयच्या कार्यालयात वकिलांची भेट घेण्यास परवानगी मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर केला. अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या वतीने अ‍ॅड. इचलकरंजीकर आणि अ‍ॅड. धर्मराज चंदेल यांनी न्यायालयात दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला.

सीबीआय अधिकाऱ्यावर आरोप

या प्रकरणात सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संवेदनशील माहिती एका इंग्रजी नियतकालिकाला पैसे घेऊन विकली, असा आरोप अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी युक्तिवादात न्यायालयात केला. न्यायालयाने त्यांचे आरोप ऐकून घेतले, मात्र आरोपांची दखल घेतली नाही.

First Published on May 27, 2019 1:14 am

Web Title: narendra dhabolkar murder case