शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. उद्धव ठाकरे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ट्विटवरुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सकाळी साडे नऊच्या सुमारास उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलं. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. उद्धव यांना आरोग्यम दिर्घायुष्य लाभावे अशी मी प्रार्थना करतो,” असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेनेमधील संबंध मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादातून कमालीचे ताणले गेले. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून दोन्ही पक्षांमधील धुसपूस सतत सुरु असते. राज्यातील भाजपा नेते शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. तर सामाना असो किंवा मुलाखती असो उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत मोदी सरकारच्या कारभारावर टीका करताना दिसतात. असं असतानाही राजकीय मतभेद बाजूला ठेवत आज मोदींनी उद्धव यांना आवर्जून शुभेच्छा दिल्या.

राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ” उद्धवजी आपणास वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!, आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा,” असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यंदा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला असून यासंदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन माहिती दिली होती. कार्यकर्त्यांना आवाहन करताना, शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानावर गर्दी करु नका असं आवाहन उद्धव यांनी केलं होतं. तसेच आपल्या वाढदिवशी आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान, प्लाझ्मा दान शिबीरांचं आयोजन करावं. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला सढळ देणगी द्यावी असंही ठाकरे म्हणाले होते.