News Flash

“काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ दिला जाईल”

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प वादाचा मुद्दा ठरला. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प वादाचा मुद्दा ठरला. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. (संग्रहित छायाचित्र। पीटीआय)

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीतून देश सावरताना दिसत आहे. रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असून, बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प वादाचा मुद्दा ठरला. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरातून पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून टीका केली आहे. “आमच्या राज्यकर्त्यांनी घर बांधले. लोकांना काय मिळाले? करोनामुळे देशातील ९७ टक्के जनता गरिबीच्या उंबरठ्यावर आहे. एप्रिल २०२० मध्ये १३ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. फक्त स्मशाने आणि कब्रस्ताने तेवढी चोवीस तास उघडी आहेत,” असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.

“ब्रिटनच्या पंतप्रधानांनी करोना काळात वेळ जात नसावा म्हणून तिसरे लग्न केले. दिल्लीत करोना काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी पंधरा एकरात नवे घर, नवे उपराष्ट्रपती निवास उभे राहत आहे. ही नवी घरे करोना विषाणुप्रूफ आहेत काय त्याबाबत केंद्र सरकारने खुलासा करायला हवा. सध्या आपले पंतप्रधान ७, लोककल्याणकारी मार्ग या १३ एकरच्या विस्तीर्ण निवासात राहत आहेत. नव्या योजनेनुसार ते १५ एकरांच्या घरात जातील. पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, पण हा सर्व उपद्व्याप फकिरीत बसत नाही, अशी टीका सुरू झाली आहे. जॉन्सन यांनी लग्न केले. आमच्या राज्यकर्त्यांनी घर बांधले. लोकांना काय मिळाले? करोनामुळे देशातील ९७ टक्के जनता गरिबीच्या उंबरठ्यावर आहे. एप्रिल २०२० मध्ये १३ कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नोकऱ्याही लोकांनी गमावल्या आहेत. सर्व काही बंद आहे. फक्त स्मशाने आणि कब्रस्ताने तेवढी चोवीस तास उघडी आहेत. इंग्लंड आणि हिंदुस्थानची परिस्थिती वेगळी नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा -“आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही पर्यायांची तयारी”

“मेहुल चोक्सीचे प्रकरण सध्या गाजते आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला हा एक आरोपी. जगाच्या हिरे बाजारात तेव्हा नीरव मोदी व मेहुल चोक्सीचे वलय होते. बँकेचे १२ हजार कोटी बुडवून त्यांनी देशाबाहेर पलायन केले. ऑण्टिग्वा नामक देशात, तेथील नागरिकत्व घेऊन चोक्सी राहू लागले. ऑण्टिग्वासारख्या अनेक देशांत नागरिकत्व आणि पासपोर्ट विकत घेता येतो. चोक्सी याच पद्धतीने त्या देशाचा नागरिक झाला. आठ-पंधरा दिवसांपूर्वी तो डॉमिनिका नावाच्या देशात घुसत असताना पकडला गेला. सध्या तो डॉमिनिकाच्या तुरुंगातून सरकारी इस्पितळात दाखल झाला. भारतीय गुप्तचरांनी आपल्याला जबरदस्तीने पळवून नेले, ताब्यात घेतले असा मेहुल चोक्सीचा दावा आहे. मेहुल चोक्सी ऑण्टिग्वाचाच नागरिक आहे. त्यामुळे भारताच्या ताब्यात देता येणार नाही, असे चोक्सीचे वकील सांगतात. चोक्सीच्या प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच भारताचे एक खासगी जेट विमान ‘डॉमिनिका’च्या विमानतळावर उतरले व थांबून राहिले. चोक्सीला आणण्यासाठीच हे खास विमान पाठवले, पण चोक्सी भारतात येणार आहे काय?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

…तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल

“ऑण्टिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांना करोना काळात इतका वेळ आहे की, ते भारतातील बहुतेक सर्वच वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना दिसत आहेत. पंतप्रधान ब्राऊन यांचा दावा आहे की ”मेहुल चोक्सी हा आमच्या देशातील विरोधी पक्षाला देणग्या देत असतो. त्यामुळे ऑण्टिग्वाच्या विरोधी पक्षाचा मेहुल चोक्सीला भारतात पाठिवण्यास विरोध आहे.” म्हणजे मेहुल चोक्सी हा भारतीय भगोडा ऑण्टिग्वाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. चोक्सीपासून आपल्या सत्तेला खतरा आहे म्हणून त्याला भारतात पाठवा, हा ब्राऊन यांचा आग्रह आहे. ब्राऊन यांनी चोक्सीला भारताच्या हवाली केलेच तर नव्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात ब्राऊन यांचा पुतळा नक्कीच उभारला जाईल. २०२२ च्या प्रजासत्ताक दिनाचे ते सन्माननीय पाहुणेही असतील, काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ही दिले जाईल,” असा टोला राऊत यांनी मोदींना लगावला आहे.

ते पुन्हा येतील हे सांगणारा मी पहिला माणूस होतो : संजय राऊत

गरीबांना काय जॉन्सनप्रमाणे तिसरे लग्न करता येत नाही

“ऑण्टिग्वा देशाला व त्यांच्या पंतप्रधानांना आता कमालीचे महत्त्व आले आहे. त्या ऑण्टिग्वा देशाची लोकसंख्या ८० हजार आहे! किती? ८० हजार!! पण हा ८० हजार लोकसंख्येचा देश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी मेहुल चोक्सीला आपल्याकडे पाठवलाच तर ‘मीडिया’ करोना वगैरे विसरून मेहुल चोक्सीच्या रोमांचकारी कथांच्या मागे लागेल व लोकांचा तेवढाच वेळ जाईल. गरीबांना काय जॉन्सनप्रमाणे तिसरे लग्न करता येत नाही व नवे घरही बांधता येत नाही, पण अशा प्रकरणांच्या कथानकात ते चांगला वेळ घालवतात,” असं म्हणत राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 8:13 am

Web Title: narendra modi central vista project sanjay raut saamana rokhthok covid crisis bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ताडोबा बफर क्षेत्रात वाघिणीचा मृत्यू
2 महाबळेश्वरसह साताऱ्यात मुसळधार पाऊस ; मांडवे गावात ढगफुटी सदृश्य परिस्थिती!
3 “पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही”; खासदार उदयन राजे यांनी व्यक्त केलं मत
Just Now!
X