पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

बचतगटातील महिला या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व्हाव्यात, यासाठी अडीच पट जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ देण्यात आला असून त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळण्यास मदत होत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

पांढरकवडा येथे शनिवारी स्वयंसहायता समूहाच्या महिलांचा महामेळावा मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. मुलांची पढाई (शिक्षण), युवकांना कमाई (रोजगार), वृद्धांना दवाई (औषधी), शेतकऱ्यांना सिंचाई (सिंचन) आणि जनसमस्यांची सुनवाई (समस्यांचे निराकरण) ही विकासाची पंचधारा आहे. याच विचारधारेचा आजचा हा कार्यक्रम असल्याचे मोदी म्हणाले. तुम्ही माझ्या कामावर समाधानी आहात का? माझ्या परिश्रमावर समाधानी आहात का? मी जे काम करतोय त्यावर तुम्ही खूश आहात का? तुमचा आशीर्वाद मला कायम राहणार का? असे प्रश्न विचारत मोदींनी जनतेशी संवाद साधला. या वेळी मोदी यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते निधीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन तसेच काही कामांचे लोकार्पण करण्यात आले.

मोदींच्या विरोधात फलक

२०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी दाभडी येथे शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्वासने फोल ठरल्याचा आरोप करीत विविध राजकीय पक्ष, संघटनांनी मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता. त्याची झलक यवतमाळ जिल्ह्य़ात पाहायला मिळाली. पांढरकवडा-कोंघारा मार्गावर अनेक ठिकाणी ‘गो बॅक मोदी’चे फलक लावण्यात आले होते. ही बाब पोलिसांना कळताच ते फलक तात्काळ काढून घेण्यात आले.

खान्देशच्या औद्योगिक विकासाला चालना

धुळे येथील खान्देश गोशाळा मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते धुळे-नरडाणा या नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी आणि सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर जलवाहिनी या योजनांचे भूमिपूजन झाले. पंतप्रधानांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. मोदी यांनी अहिराणी भाषेत भाषणाला सुरुवात केली. प्रधानमंत्री सिंचन योजनेतून महाराष्ट्रात मोठे काम झाले आहे. राज्यातील दुष्काळ निवारणार्थ केंद्राने मोठा निधी दिला. या निधीतून पूर्ण होणाऱ्या योजनांमधून महाराष्ट्र सुजलाम होईल. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. खान्देशात कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प होणार आहेत. औद्योगिक विकासाला चालना मिळू शकेल, अशा सुविधा येथे उपलब्ध होतील. यामुळे देशाच्या अनेक भागांशी धुळ्याचा संपर्क होईल. आज धुळे-नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ होत असला तरी हा रेल्वे मार्ग भविष्यात मनमाड-इंदूर मार्गाशी जोडला जाईल. ही कामे पूर्णत्वास गेल्यानंतर मार्गावरील सर्व भागांत पुरेसा रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.