गेली दहा ते पंधरा वष्रे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र लुटला, राज्याची तिजोरी लुटून रिकामी केली, अशांच्या ताब्यात पुन्हा महाराष्ट्र दिला तर येणारी भावी पिढी माफ करणार नाही. निवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस सन २०१४ ची निवडणूक ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पर्वाच्या युगाच्या शेवटच्या दिवसाची असून आता येणारे युग हे पर्वाचे असून  दोन्ही पक्षाच्या चेल्याचपाटय़ांचे युग संपले. चांगल्या युगाच्या पर्वाला दिवस आले आहे, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढविताना पंढरपूर येथील जाहीर सभेत सांगितले.
महायुती रासप, शिवसंग्राम,आरपीआय, भाजपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना युतीचे उमेदवार प्रशांत परिचारक व जिल्ह्यातील महायुतीच्या ११ उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकाच्या आवारात रविवारी दुपारी आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी नरेंद्र मोदी यांचा माजी आमदार सुधाकर परिचारक, प्रशांत परिचारक यांनी वारकरी सांप्रदायाचे प्रतीक वीणा, टाळ व श्री पांडुरंगाची प्रतिमा देऊन सत्कार केला. या वेळी खासदार शरद बनसोडे, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, पश्चिम महाराष्ट्राचे मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तसेच महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख, गणपत साठे, श्रीकांत देशमुख, माळशिरसचे खंडागळे, सोलापूर येथील मोहिनी पत्की असे ११ उमेदवार व सदाभाऊ खोत, महिला जिल्हाध्यक्षा शकुंतला नडगिरे, शहराध्यक्ष बादल ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार पाटील बोरगांवकर, प्रणव परिचारक या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढविताना ते म्हणाले, यांच्या घडाळ्यातील वेळ १० वाजून १० मिनिटे असून याचा अर्थ १० वर्षांत १० पट भ्रष्टाचार असा, तर मुळातच एन.सी.पी.चा जन्म हा भ्रष्टाचारातून झालेला आहे, असे सांगतानाच ते म्हणाले एन.सी.पी. म्हणजे नॅचरल करप्शन पार्टी आहे. ते काय राज्याचे भले करणार, काँग्रेस, राष्ट्रवादी ही जनतेला आपली खाजगी मालमत्ता समजून जनता आपल्या खिशात आहे अशा घमेंडीत वागते .परंतु मी जनता जनार्दनाला ईश्वराचे रूप मानतो, असे त्यांनी सांगितले.
व्यासपीठावर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अभिवादन करून सर्व उमेदवारांची शुध्द मराठीतून नावे घेऊन त्यांनी, जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥ जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥ अशा पवित्र क्षेत्री येण्याचे मला भाग्य लाभले असून त्याचा मला परम आनंद असून देवाकडे प्रार्थना करतो की, देशाचे भले कर, भले करण्यासाठी आशीर्वाद दे, असे मराठीत सांगून  पुढे हिंदीतून भाषणाला सुरूवात केली.
आज या ठिकाणी एवढा जनसागर उसळला असून या पूर्वीही मी जिल्ह्यात आलो होतो, त्यापेक्षाही मोठी गर्दी आज या ठिकाणी झाली आहे, माता – भगिनी, मुले ही झाडावर, घराच्या गच्चीवर बसून भाषण ऐकण्यात मग्न आहेत. मी हे दृश्य पाहून भारावून गेलो आहे. तुम्ही आशीर्वाद देण्यासाठीच आला आहात. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही भल्याभल्यांना झोपवले, जिल्ह्यात तर कमालच केली. आता विधानसभेत बहुमत द्या, तुमच्या खांद्याला खांदा लावून राज्याचा विकास करेन, असा विश्वास मी तुम्हाला देतो असे सांगून दिल्लीमध्ये मी पंतप्रधान म्हणून खुर्चीवर बसलो नसून तुमच्या तिजोरीचे रक्षण करण्यासाठी चौकीदार म्हणून बसलो आहे. त्यामुळे राज्याची तिजोरी चोरांच्या हातात, लुटारूंच्या हातात न देण्याची तुम्ही दक्षता घ्या व राज्यातील भ्रष्ट युग संपवा व चांगल्या युगाच्या पर्वाची बहुमत देऊन सुरूवात करा, विकास मी करतो असे मी तुम्हाला वचन देतो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.