02 March 2021

News Flash

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा अहंकार-अण्णा हजारे

३ वर्षात पाठवलेल्या एकाही पत्राचे उत्तर दिले नाही

अण्णा हजारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या पंतप्रधानपदाचा अहंकार आहे असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी या गावात झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजवर ३० पत्रे पाठवली मात्र एकाही पत्राचे उत्तर त्यांनी दिले नाही. कारण त्यांना त्यांच्या पंतप्रधान पदाचा अहंकार आहे. २३ मार्च पासून मी आंदोलन सुरू करणार आहे याचाही अण्णा हजारेंनी पुनरूच्चार केला. यावेळी असे आंदोलन होणार जसे याआधी कधीही झालेले नाही. हे आंदोलन सरकारसाठी निर्वाणीचा इशारा देणारे आंदोलन असणार आहे. देशात कृषीसंकट वाढते आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. याचसाठी २३ मार्चला एक रॅलीही काढणार आहे असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

रॅली आणि आंदोलन करून मतदार गोळा करायचे हा माझ्या आंदोलनाचा उद्देश नाही. लोकपालच्या प्रश्नावर ज्या प्रकारे आंदोलन झाले होते त्याचप्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आंदोलन उभे राहिल याची मला खात्री आहे असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. लोकपाल आंदोलनाचीही लढाई अद्याप संपलेली नाही. लोकपाल विधेयक लागू करणे, लोकायुक्तांची नियुक्ती करणे, शेतकऱ्यांसाठी प्रति महिना ५ हजार रूपये पेन्शन लागू करणे आणि शेतीमालाला चांगला दर मिळवून देणे या आपल्या महत्त्वाच्या मागण्या आहेत असेही अण्णा हजारेंनी सांगितले. तसेच सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींची जास्त चिंता आहे असा टोलाही त्यांनी लगावला. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

माझ्या आंदोलनातून अरविंद केजरीवालसारखा एकही नेता तयार होणार नाही याची काळजी मी यावेळी घेतली आहे असेही अण्णा हजारेंनी सांगितले. माझ्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांकडून मी १०० रूपयांच्या स्टँप पेपरवर शपथपत्र लिहून घेणार आहे. आंदोलन संपल्यावर कोणत्याही पक्षात सहभागी होणार नाही हे आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना प्रतिज्ञापत्रावर लिहून द्यावे लागणार आहे असेही अण्णा हजारे यांनी सांगितले. प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावरही आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकाने राजकीय पक्षात सहभाग घेतला तर त्याच्याविरोधात मी खटला भरेन असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 9:44 pm

Web Title: narendra modi has ego of being prime minister as he never replies my letter says anna hazare
टॅग : Anna Hazare
Next Stories
1 चंद्रकांत पाटील यांचे कन्नड भाषेत गाणे, सीमाभागात नव्या वादाला तोंड फुटले
2 दुसरी पत्नीही मागू शकते पोटगी
3 ‘२०१४ मध्ये भाजपची लाट होती, फसव्या सरकारला आता ओहोटी लागली’
Just Now!
X