नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्ष हायजॅक केला असून अडवाणी, जोशीसारख्या ज्येष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेतून डावलण्याचा प्रयत्न म्हणजे हुकूमशाही प्रवृत्तीच असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी प्रचार सभेत केली. काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज तालुक्यातील मालगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदींचे कत्रेधत्रे दोन उद्योगपती असून त्यांच्या माध्यमातून देशाचे राज्य हस्तगत करण्याचा कुटील डाव रचला आहे.  सर्व सामान्यांना त्यामुळे न्याय मिळण्याची शक्यता दुरापास्त होण्याची भीती या जातीयवादी शक्तीमुळे निर्माण झाली आहे. प्रचारावरील खर्च, मार्केटींग, इव्हेंट मॅनेजमेंट आणि जाहिरातबाजी या माध्यमातून जनतेपुढे खोटारडापणा सांगण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मोदी यांच्या पुढे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. आíथक, परराष्ट्र अथवा सामाजिक धोरण विरोधकांच्या जाहीरनाम्यात कोठेही दिसत नाही. केवळ वैयक्तिक टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी आखला असून हे सर्वसामान्यांना परवडणारे नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेवर आधारित संसदीय लोकशाही पद्धती देशात अवलंबली जाते. मात्र या लोकशाहीलाच मोदींच्या रूपाने धोका उत्पन्न झाला आहे.  गुजरात मॉडेलचा उदोउदो करणा-या मोदींनी कोणत्याही व्यासपीठावर चच्रेसाठी समोर यावे हे आव्हान स्वीकारण्यास ते राजी नाहीत यातूनच त्यांचा खोटारडापणा अधोरेखित होतो असेही त्यांनी सांगितले.
गोध्रा हत्याकांड झाले त्यावेळी हेच मोदी वातानुकूलीत खोलीत बसून राजधर्म टाळण्याचा प्रयत्न करीत होते. अशा माणसाला अमेरिकेसारख्या राष्ट्रानींही प्रवेश नाकारला आहे. जागतिक पातळीवर किंमत नसणारा माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार कसा होऊ शकतो, असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.
यावेळी गृहराज्य मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री मदन पाटील यांचीही भाषणे झाली.  प्रारंभी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमर पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उमेदवार प्रतीक पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, मिरज पंचायत समितीचे सभापती सुभाष पाटील, माजी सभापती आण्णासाहेब कोरे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.