आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्र लढवणार का ? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना दिल्लीत भोजनाचे निमंत्रण दिले आहे. लोकमतने उच्चपदस्थ सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मात्र मोदी यांनी भोजनासाठी मातोश्रीवर यावे असा आग्रह शिवसेनेकडून धरला जात आहे.

निवडणुकीला अवघे दोन ते तीन महिने उरलेले असतानाही शिवसेनेने भाजपा विरोधातील आक्रमक भूमिका सोडलेली नाही. त्यामुळे युती होण्याविषयी अनेकांच्या मनात साशंकता आहे. भाजपाकडून मात्र शिवसेनेबरोबर युती होणार असा ठामपणे दावा केला जात आहे. शिवसेनेने मात्र युतीविषयी कोणतेही सकारात्मक संकेत दिलेले नाहीत.

युतीचा हा तिढा सोडवण्यासाठी आता मोदींनी पुढाकार घेतला असून उद्धव यांना दिल्लीत भोजनाकरिता बोलावले आहे. शिवसेनेने सुद्धा हे निमंत्रण फेटाळलेले नाही. त्यामुळे जेवणाच्या टेबलावर युतीचा तिढा सुटू शकतो. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सुद्धा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकरता महापौर बंगल्याचे हस्तांतरण, निधीची तरतूद करुन असे शिवसेनेला अनुकूल निर्णय घेतले आहेत. काही महिन्यांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुद्धा मातोश्रीला भेट देऊन युती संदर्भात चर्चा केली होती. शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढल्यास त्यात दोन्ही पक्षांचे नुकसान आहे. सर्वेक्षण चाचण्यांमधून ही बाब समोर आली आहे.