पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन; विरोधकांवर टीका

कृषिमालाच्या दराचा भाजपने गांभीर्याने विचार करून तोडगा काढला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत पाच एकर जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये अनुदान दिले जाते. आपले सरकार पुन्हा सत्तेत आल्यास पाच एकरची अटही काढली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. महाराष्ट्राचे पाणी गुजरात पळवून नेणार असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. परंतु असा कोणताही निर्णय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोमवारी पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधानांची जाहीर सभा झाली. कांदा, भाजीपाल्यासह कृषिमाल उत्पादित होणाऱ्या परिसरात सभा होत असल्याने आंदोलन होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.

काँग्रेस आघाडीच्या काळात दहशतवाद्यांकडून देशभरात बॉम्बस्फोट घडविले जायचे. तत्कालीन सरकार श्रद्धांजली सभा घेऊन जगात पाकिस्तानच्या नावाने रडगाणे गात असे. काँग्रेसचे हे घाबरट धोरण भाजपने बदलले. दहशतवादी कुठेही लपले तरी त्यांना यमसदनी धाडण्याचा पवित्रा स्वीकारला. यामुळे काश्मीर वगळता देशात कुठेही दहशतवादी हल्ले झाले नाहीत, असा दावा मोदी यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

जाणता राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांची विधाने पाहिली की, त्यांच्याकडे सदसद्विवेकबुद्धी राहिली नसल्याचे दिसून येते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी लोकसभेच्या रिंगणात उतरली. परंतु मोदी यांनी अशी गुगली टाकली की, कप्तानालाच माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादीच्या काहींना तर आपण स्वातंत्र्यसेनानी म्हणून कारागृहात गेल्याचे वाटते, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.

‘आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नाही’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासींना दिलेल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील सभेत दिली. तसेच आरक्षणाप्रमाणेच कुठल्याही आदिवासींच्या जमिनीवर पंजा चालू देणार नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. हीना गावित आणि धुळ्याचे भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ नंदुरबार येथे दुपारी मोदी यांची सभा झाली. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. ‘चौकीदार चोर है’ या वाक्यामुळे राहुल गांधी यांना न्यायालयात माफी मागावी लागल्याने त्यांची फजिती झाल्याचे सांगितले. मोदी यांनी उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याने ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला. भाजपाच्या किसान सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळाले. देशातील शेतमजूर आणि आदिवासी मजुरांना निवृत्तिवेतन लागू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या आधार कार्डची सुरुवात नंदुरबारमधून झाली त्याच आधारला निराधार करण्याचे काम काँग्रेसने केले. आपण आधारला बँक खात्याशी संलग्न करून प्रत्येक योजनेतील गळती थांबवून तिचा पूर्ण लाभ खालच्या स्तरापर्यंत पोहोचविल्याचे मोदींनी सांगितले.