सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा येत्या बुधवारी, ९ एप्रिल रोजी सोलापूरच्या होम मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. दुपारी अडीच वाजता होणा-या या जाहीरसभेची जय्यत तयारी केली जात असून या सभेमुळे निवडणुकीतील वातावरण पार बदलून भाजपला लाभ होईल, असा विश्वास भाजपचे शहराध्यक्ष, आमदार विजय देशमुख यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात सोमवारी एका पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार देशमुख यांनी नरेंद्र मोदी यांच्या सभेला शहर व जिल्ह्य़ातून सुमारे दोन ते अडीच लाख कार्यकर्ते, नागरिक व तरूण वर्गाची उपस्थिती राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. मोदी हे सोलापुरात दुस-यांदा येत आहेत. यापूर्वी मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळीही त्यांची जाहीर सभा होम मैदानावर झाली होती. परंतु आता मोदी यांच्याविषयीची विश्वासार्हतेची भावना जनमानसात वाढल्याने आपसूकच त्यांचे वलयही वाढले आहे. त्यातून निर्माण  झालेल्या ‘मोदी लाटे’चा लाभ सोलापूरच्या भाजपला निश्चितपणे मिळेल. समोर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या रुपाने काँगेसचा बलाढय़ उमेदवार असला तरी मोदी लाटेत शिंदे यांचा निभाव लागणार नाही, असा दावाही आमदार देशमुख यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय सोलापूर मतदारसंघात पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे आदींच्या प्रचार सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.