18 January 2019

News Flash

किमान अध्ययन, कमाल छपाई!

शिक्षकांसाठी पंतप्रधानांच्या छायाचित्रासह अध्ययन निष्पत्तीची भित्तिपत्रके

|| सुहास सरदेशमुख

शिक्षकांसाठी पंतप्रधानांच्या छायाचित्रासह अध्ययन निष्पत्तीची भित्तिपत्रके

तुमचे मूल शाळेत शिकते आहे ना? मग त्याला येणाऱ्या किमान अध्ययन क्षमता पालकांना माहीत असायलाच हव्यात असे सरकारला अचानक वाटले आणि त्यांनी राज्यस्तरावरून घडीपत्रके पाठविली. या क्षमतांची माहिती सतत शिक्षकाच्या डोळय़ांसमोर असावी म्हणून भलीथोरली भित्तिपत्रकेही (पोस्टर) प्रकाशित केली. गुळगुळीत जाड कागदावर करण्यात आलेल्या या साहित्यावर या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मनुष्यबळमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची छायाचित्रे आहेत. अशा प्रकारचे खास साहित्य पुरविण्यामागचा उद्देश काय, आणि शाळा बंद असताना पालकांना घडीपत्रिका द्यायच्या कशा, असा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे. पुरविण्यात आलेल्या या मजकुरामध्ये नेत्यांचे फोटो टाकण्याच्या या प्रकारावर आता शिक्षण विभागातच चर्चा सुरू झाली आहे. इयत्तानिहाय अध्ययनस्तर पालकांपर्यंत पोहोचविण्याचा उन्हाळय़ाच्या सुट्टीतील शिक्षण विभागाचा हा पराक्रम वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबादसारख्या जिल्हय़ात तब्बल ४ लाख ३९ हजार ३३१ घडीपत्रिका पुरविण्यात आल्या आहेत.

‘अध्ययन निष्पत्ती साधू या, महाराष्ट्र प्रगत करू या’ या घोषवाक्यासह मुख्यमंत्री फडणवीस व शिक्षणमंत्री तावडे यांचे छायाचित्र असणाऱ्या घडीपत्रिकेत पालकांना त्यांच्या पाल्याबाबत कोणती माहिती असावी, याची भलीथोरली यादी दिली आहे. त्यातील मजकुराची व्याप्तीही कमालीची आहे. पाचवी वर्गात शिकणाऱ्या पालकाने मराठीमध्ये आपले मूल कसे आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर दिलेली अध्ययन निष्पत्ती अशी आहे- ‘ऐकलेल्या, वाचलेल्या साहित्यातील (विनोदी, साहसी, सामाजिक, विषयांवरील कथा, कविता इत्यादी) विषय, घटना, चित्रं, पात्रं व शीर्षक या बाबत चर्चा करतात, प्रश्न विचारतात, आपले मत देतात, तर्क करतात व निष्कर्ष काढतात’ अशी व्याप्ती पालकांनी तपासयची आहे.’ एवढी अध्ययन व्याप्ती पालकांना कळेल का, असा प्रश्नच आहे.  बीड जिल्हय़ातील ऊसतोड मजुरीला जाणाऱ्या पालकाला ही अध्ययन क्षमता कशी उमजेल, असा सवाल उपस्थित करीत शाळाबाहय़ मुलांसाठी काम करणारे हेरंब कुलकर्णी म्हणाले, ‘आपल्या मुलाला कोणत्या इयत्तेत काय यावे हे पालकांना माहीत असायला हवे,  माहीत व्हायला हवे. पण हा मजकूर छपाई करण्यात ‘किमान अध्ययन आणि कमाल ‘छपाई’ असे दिसून येत आहे. खरेतर अशी छपाई जिल्हास्तरावरही करता आली असती.’

जसे मराठीच्या मजकुराचे तसेच गणिताच्या अध्ययन क्षमतेचे पाचवीचे गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाने ही घडीपत्रिका वाचून मूळ संख्या आणि सहमूळ संख्यांचे वर्गीकरण माझ्या मुलाला का येत नाही, असा प्रश्न गुरुजींना शाळेत जाऊन विचारावा, असे अभिप्रेत आहे. एवढय़ा क्षमता वाचून ग्रामीण भागातील पालकाने शिक्षण व्यवस्थेमध्ये घडीपत्रिका वाचून बदल करावेत, असे अभिप्रेत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी सांगतात. मुळात अशा प्रकारचे साहित्य का पाठविले आणि त्याचा उपयोग कसा करायचा, हे अजून यंत्रणांना कळाले नाही. वरून छपाई करून साहित्य आले आहे ते शाळांपर्यंत पुरवायचे आहे, एवढेच कर्मचारी सांगतात. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने पाठविलेल्या पत्रानुसार १ ते ८ वी च्या शाळेत लावण्यासाठी भित्तिपत्रके प्रत्येक इयत्तानिहाय विद्यार्थिसंख्येनुसार घडीपत्रिका तसेच शिक्षकांसाठी अध्ययन निष्पत्ती पुस्तिका पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. सुनील मगर यांनी काढलेल्या या आदेशानुसार आता छपाई साहित्याचे वाटप होत आहे.

बोजड भाषेत भित्तिपत्रक

इयत्ता ७ वीच्या सामान्य विज्ञानविषयक पोस्टरवर नेत्यांच्या छायाचित्राखाली छपाई करण्यात आलेल्या किमान अध्ययन क्षमतेचा सरकारी मजकूर भाषिक अर्थाने मोठा गमतीचा आहे. तो असा- ‘ निरीक्षणक्षम वैशिष्टय़ांच्या आधारे पदार्थ व सजीव ( प्राणिजन्य तंतू, दातांचे प्रकार, आरसे व भिंग, इत्यादी) ओळखतो. जसे, की त्याचे स्वरूप, स्पर्श, कार्य इत्यादीच्या साहाय्याने.’ हा मजकूर शिक्षकांच्या सतत समोर असेल तर शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती अधिक योग्य होईल, असे मानून २६ मुद्दय़ांचा मजकूर देण्यात आला आहे. तो शिक्षकांनी समोर ठेवून गुणवत्ता वाढवावी, असे सरकारला अभिप्रेत आहे.

मानव संसाधन मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसारच ही सारी छपाई झाली आहे. तसेच छापील साहित्यातील भाषा अध्ययन साहित्याचा भाग असल्याने ती बोजडही नाही.  – सुनील मगर, विद्या प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य

अशी आहे संख्या

  • राज्यातील पहिली ते आठवीचा वर्ग असणाऱ्या शाळांची संख्या – एक लाख ६ हजार ५४६
  • विद्यार्थी संख्या- एक कोटी ५९ लाख १२ हजार १०७
  • शिक्षक- ७ लाख २५ हजार ४४६
  • विद्यार्थिसंख्येत घडीपत्रिका, वर्गखोल्यांसाठी एक भित्तिपत्रक
  • शिक्षकांसाठी अध्ययन स्तर निश्चिती पुस्तिका

First Published on May 14, 2018 12:58 am

Web Title: narendra modi posters in school