30 March 2020

News Flash

मोदींची सभा, गिरी प्रकरणाने काँग्रेस बॅकफुटवर!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची येथील सभा, तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या हत्येचे प्रकरण, तसेच भाषणातून काँग्रेसवर ‘तंदूर ते लातूर’ असा हल्ला

| April 12, 2014 01:40 am

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची येथील सभा, तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी यांच्या हत्येचे प्रकरण, तसेच भाषणातून काँग्रेसवर ‘तंदूर ते लातूर’ असा हल्ला चढविणाऱ्या मोदींनी कल्पनाच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष बॅकफुटवर आल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या शहर विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस कल्पना गिरी यांची विधानसभा मतदारसंघाचे शहराध्यक्ष महेंद्रसिंह चौहान यांनी हत्या केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाने चांगलेच राजकीय वळण घेतले. चौहान यास काँग्रेसमधून निलंबित केल्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेस पक्ष कल्पनाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचेही जाहीर करण्यात आले, मात्र तोपर्यंत शिवसेना जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी यांनी कल्पनाच्या कुटुंबीयांसह पत्रकार बैठक घेऊन प्रकरण तापवले. शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह थेट नरेंद्र मोदी यांनीही हे प्रकरण लावून धरले. या प्रकरणाला राष्ट्रीय पातळीवर नेताना मोदी यांनी ‘तंदूर ते लातूर’ अशी तोफ डागत काँग्रेसच्या महिलाविषयक धोरणाची खिल्ली उडविली. गिरी कुटुंबीयांना भेटून मोदी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या घडामोडींमुळे बॅकफुटवर आलेल्या पक्षाविषयी लोकांच्या मनात असलेला रोष कमी कसा करायचा? या चिंतेने काँग्रेसला आता ग्रासले आहे.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसने आक्रमक प्रचार सुरू ठेवला. भाजपची यंत्रणा तोकडी असली, तरी प्रत्येक ठिकाणी काँग्रेसला मोदींची हवा या प्रश्नाला उत्तर सापडत नाही. जिल्हा क्रीडासंकुलाच्या मदानावर झालेल्या मोदी यांच्या सभेने शहरातील कुठल्याही राजकीय पक्षाच्या उपस्थितीचे विक्रम मोडीत काढले. भर पावसात सभेला मिळालेला प्रतिसाद विरोधकांच्या मनात धडकी भरवणारा ठरला.
बेरोजगारी, शेती, उद्योग या विषयांना मोदी यांनी स्पर्श केला, मात्र लातूरकरांच्या जिव्हाळय़ाच्या पाणीप्रश्नावरही ते बोलले. गुजरातेतील प्रत्येक गावात बंद वाहिनीद्वारे पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी दिले जाते. दहा दिवसांतून एकदा पाणी मिळत असलेल्या लातूरकरांना याचे अप्रूप वाटले.
आता राहुल गांधींची सभा
मोदींच्या सभेनंतर विरोधी गोटात उत्साहाचे, तर आघाडीच्या वर्तुळात विश्वास डळमळीत झाल्याचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचाराची सांगता आता राहुल गांधी यांच्या सभेने होणार आहे. राहुल गांधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गमावलेला विश्वास परत मिळवून देतात काय, यावरच काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. सोमवारी (दि. १४) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने राहुल गांधींच्या सभेचे आयोजन केले आहे. सभेची जंगी तयारी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2014 1:40 am

Web Title: narendra modi rally congress on back foot in issue of kalpana giri
Next Stories
1 मी लालू, तर राज ठाकरे हे आघाडीचा भालू- आठवले
2 ‘शेतकऱ्यांनी काँग्रेसला मतांची मारपीट करावी’
3 वजाबाकीच्या राजकारणामुळे राणेंची कोंडी
Just Now!
X