मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी मुंबईत एलफिस्टन येथे चेंगराचेंगरीची घटना घडली होती. नुकत्याच भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारातही एकाचा बळी गेला. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी मौन बाळगून आहेत. मात्र, कमला मिलमध्ये लागलेल्या आगीत जेव्हा १४ गुजराती व्यक्तींचा मृत्यू झाला तेव्हा मोदींनी लगेचच ट्विट करून शोक व्यक्त करण्याची तत्परता दाखवली. इतरवेळी मोदींनी असे का केले नाही, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रातील भूमिका घेणारे साहित्यिक कुठे गेले? राज ठाकरेंचा सवाल

पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आरुढ झाल्यानंतरही त्यांना गुजरात आणि तेथील जनतेबद्दल इतकी आत्मीयता आहे. हे बघून कधीकधी मला चांगलही वाटतं. मात्र, हीच गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्याबाबत बोलतो तेव्हा मला संकुचित ठरवले जाते, असे राज यांनी म्हटले. जेव्हा देशात बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणायचे निश्चित झाले तेव्हा मोदींनी अहमदाबादची निवड केली. बडोद्यात द्रुतगती मार्ग बांधण्यासाठी केंद्र सरकारने २२ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. मी केवळ विरोधाला विरोध करणारा माणूस नाही. मात्र, या सगळ्या घटनांची संगती लावल्यास मोदींकडून गुजरातला दिले जाणारे प्राधान्य दिसून येते, असे राज यांनी सांगितले.

याशिवाय, आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांनाही कानपिचक्या दिल्या. यावेळी राज यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणीबाणीचा काळ आणि केरळमधील साहित्य चळवळीचा दाखला देत राज्यातील साहित्यविश्वाला फटकारले. समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे. लोकांना वर्तमानातील घडामोडी समजावून सांगणे ही तुमची जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडताना दिसत नाही. त्यामुळे आतातरी महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीविषयी बोला , त्याबद्दल लिहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.