|| अशोक तुपे, सीताराम चांडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्याला ग्वाही; पीक विमा योजनेतून साहाय्य करण्याचे आश्वासन

पावसाने ओढ घेतल्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे दिली.

साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या समारोपप्रसंगी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना चावीवाटपासह अनेक विकासकामांचे लोकार्पण त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी त्यांनी राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सहकार्य करण्याचे स्पष्ट केले. प्रसंगी प्रधानमंत्री विमा पीक योजनेतून आर्थिक मदत देण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

राज्यातील अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून मदत करण्यात आली आहे. राज्य सरकारची जलयुक्त शिवार योजना अभूतपूर्व असून १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून ९ हजार गावांचा दुष्काळमुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी जलयुक्त शिवार योजनेची प्रशंसा केली. शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी काँग्रेसचे नाव न घेता टीका करत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग मोदी यांनी फुंकले. शिर्डीतील साई संस्थानच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच घरकुल योजनेचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे सभापती हरिभाऊ  बागडे, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, खासदार दिलीप गांधी, खासदार सदाशिव लोखंडे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी उपस्थित होते.

राज्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या २ लाख ४४ हजार घरकुलांच्या लाभार्थीपैकी १० जणांना प्रातिनिधिक स्वरूपात चाव्या देण्यात आल्या. अन्य लाभार्थीचा दृक्-श्राव्य माध्यमाद्वारे ई-गृहप्रवेश सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला. संस्थान व सरकारच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या पूर्वीच्या सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडत केद्र सरकार गरिबांसाठी राबवीत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, २०२२ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना प्रत्येक बेघराला घर देऊ न त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल. गरीब व मध्यमवर्गीयांच्या भल्यासाठी सरकार गंभीर असून अनेक योजना आणत असून त्यात राजकीय स्वार्थ नाही. घरकुल योजना हे त्याचे उदाहरण आहे. मागील सरकारच्या काळात ४ वर्षांत केवळ २५ लाख घरे बांधण्यात आली. मात्र भाजपचे सरकार केंद्रात आल्यानंतर १ कोटी २५ लाख घरे बांधण्यात आली. पूर्वीचे सरकार असते तर घरकुलासाठी आणखी २० वर्षे गरिबांना तिष्ठत बसावे लागले असते. पूर्वी घरबांधणीसाठी दीड वर्षांचा कालावधी लागत असे. आता तो एक वर्षांपेक्षा कमी केला असून घराचा आकार वाढविला आहे. सरकारी मदत ७० हजार रुपयांवरून १ लाख २० हजार केली. लाभार्थीची निवड पारदर्शकपणे करून थेट खात्यात पैसे वर्ग केले. घरकुलांबरोबरच अनेक सुविधा दिल्या. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्यात येणार असून एका महिन्यात या योजनेत एक लाख रुग्णांना लाभ मिळाला. या योजनेमुळे शहरांमध्ये आरोग्यविषयक पायाभूत सुविधा तर उपलब्ध होतीलच, शिवाय नवीन रुग्णालयामुळे रोजगारही मिळेल, असा दावा त्यांनी केला.

पर्यटन स्थळे शिर्डीशी जोडणार

पर्यटनाला सरकार प्राधान्य देणार असून अजंठा व वेरुळ येथे जगभरातून पर्यटक येतात. श्रद्धा, अध्यात्म, इतिहास याला रोजगाराशी जोडून ही सर्व पर्यटन स्थळे शिर्डीशी एकत्र जोडण्यात येतील. साईबाबांनी त्याग, जनसेवा, परिश्रमाची शिकवण दिली. साईबाबांच्या पायाशी बसून गरिबांची सेवा करण्यासारखे दुसरे काम नाही, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी समता, एकात्मता, समरसता या मूल्यांची शिकवण दिली. समाजात भेद निर्माण करणाऱ्या शक्तींचा पराभव करण्यासाठी त्यांचे विचार मोलाचे आहे. तोडणे सोपे असते, पण जोडणे मुश्कील असते. त्यामुळे तोडणाऱ्यांना पराभूत करा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात पंतप्रधान आवास योजनेतून अडीच लाख घरे बांधली असून डिसेंबरअखेपर्यंत साडेचार लाख लाभार्थीची घरकुले पूर्ण होतील. आणखी ६ लाख घरकुलांना केंद्राने परवानगी दिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न २०१९ पूर्वीच साकार होऊ न राज्यात एकही बेघर राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्य़ातील कुकडी व निळवंडेचे अपूर्ण काम पूर्ण करू, तसेच नगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी ५० कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. राज्यात दुष्काळाचे सावट असून त्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रारंभी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी घरकुल योजनेच्या काही लाभार्थीशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठीतून संवाद साधला. या वेळी आमदार स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे हे उपस्थित होते.

लाभार्थी उठून निघून गेले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० लाभार्थीना घरकुलाच्या प्रतीकात्मक चाव्या व कलश देण्यात आले. या कार्यक्रमासाठी २० जिल्ह्य़ांतून ४० हजार लाभार्थीना खास बसगाडय़ांची व्यवस्था करून आणण्यात आले होते. सुरक्षेमुळे त्यांना सकाळी ७ वाजताच सभास्थळी आणण्यात आले. दुपारी १ वाजता कार्यक्रम संपला. त्यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे लाभार्थी त्रस्त झाले होते. ई संवादामुळे कार्यक्रम लांबला. त्यामुळे वैतागलेले लाभार्थी पंतप्रधानांच्या भाषणातून शेवटी शेवटी उठून निघून गेले.

२०२२ पर्यंत सर्वाना घर

काँग्रेसच्या सरकारच्या काळात गरिबांसाठीच्या योजना राबवण्याबाबत मुळीच गांभीर्य बाळगले गेले नाही. केवळ एका घराण्याचा उदोउदो करत मतपेढी तयार करून राजकीय स्वार्थ साधण्यातच त्यांनी धन्यता मानली; पण भाजपचे सरकार केंद्रात आल्यानंतर गरिबांसाठीच्या योजनांत राजकारण न आणता घरकुल योजनेसह वीज, पाणी, गॅस, शौचालय व आरोग्यविषयक सुविधा वेगाने राबवण्यात आल्या. २०२२ मध्ये स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील तेव्हा या देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.