नंदूरबारचा चहावाला, सोलापूरच्या हातमागावर विणलेले जॅकेट, आदिवासींची वारली चित्रे, साताऱ्याचे त्यांचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विविध भागांतील लोकांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला, तर घरकुलाची चावी मिळाल्याने मिठाई कधी देणार अशी गमतीने विचारणा, तर कधी एखाद्याकडे गाण्याची फर्माइश करीत पंतप्रधानांनी कुठलाही आडपडदा न ठेवता मोकळा संवाद साधला.

साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी येथे आले. त्यानंतर सोहळय़ानिमित्त लेंडी बागेत उभारलेल्या ध्वजाचे ध्वजावतरण करून सांगता करण्यात आली. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेतील अडीच लाख लाभार्थीचा ई-गृहप्रवेश त्यांच्या हस्ते झाला. या वेळी मोदी यांनी लाभार्थीशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. बहुतांश वेळ ते लाभार्थ्यांशी मराठीतून बोलले.

लाभार्थीशी दृक्श्राव्य माध्यमाच्या आधारे त्यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील सिंगा वासावे यांच्याशी सर्वप्रथम संवाद साधला. घरकुल मिळाल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का? नवीन घर मिळाल्यानंतर तुम्ही मिठाई वाटली का? असे त्यांनी विचारले. मोदी यांनी मला मिठाई पाठवणार का? असा प्रश्न केला. त्यावर तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्हीच नंदूरबारला या, असे त्यांनी निमंत्रण दिले. नंदूरबारच्याच अहिल्या पाडवी यांनी घर मिळाल्यामुळे आता घरी पाहुणे येतात, असे सांगितले.

अमरावतीच्या लाभार्थीना मोदी यांनी घरासाठी अर्ज केला तेव्हा कुणी पैसे मागितले का? लाच द्यावी लागली का? असा प्रश्न विचारला. पूर्वी फालतू लोक मध्यस्थ असायचे, त्यांना घरकुलांसाठी पैसे द्यावे लागायचे.  आता आमचे सरकार आल्यानंतर पारदर्शकता आली अन् दलाल बाजूला केले. थेट लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

सोलापूरच्या बिस्मिल नाईकवाडी यांच्याशी संवाद साधताना केंद्र सरकारने पुरुषांच्या नव्हे तर महिलांच्या नावावर घरे केली, त्यामुळे त्यांना शक्ती मिळाली. घरातील पुरुष त्यामुळे रागावले का? असे मोदी यांनी विचारले.

नागपूरच्या नाणूभाई निमावत यांना घराची पूजा केली का? असा प्रश्न विचारला. यंदाच्या दिवाळीत आनंद असून दिवे लावून तो साजरा करू, असे लाभार्थीनी सांगितले. ठाण्याच्या सुनीता परब यांच्या घरावर वारली चित्रे काढली होती. त्याचा त्यांनी उल्लेख केला. आदिवासींना त्यांनी पारंपरिक गाणे म्हणायला सांगितले. सातारच्या शालिनी पवार यांना मोदींशी संवाद साधताना अश्रू अनावर झाले. साताऱ्याचे लक्ष्मणराव इनामदार ऊर्फ वकील साहेब हे माझे गुरू होते, असे सांगून त्यांनी आठवणींना उजाळा दिला.