२८ मार्चला जाहीर सभा

वर्धा : २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धेतून करणार असून २८ मार्चला त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणूकविषयक माहिती देण्यासाठी वर्धा लोकसभा मतदारसंघ प्रचार संयोजक सुधीर दिवे, अध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, मित्रपक्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश सराफ  व रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांनी पत्रकार परिषदेत  मोदी यांच्या सभेबाबत माहिती दिली.

२०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धेतच घेतली होती. यावेळी सुद्धा प्रचाराचा शुभारंभ वध्रेतून करण्याचे ठरले. येथील स्वावलंबी मैदानावर सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे.  येथून मोदी अकोला व नंदूरबार येथे जाण्याची  शक्यता आहे. भाजपच्या सांसदीय मंडळातर्फे  लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. वध्रेचा उमेदवार निश्चित झाला आहे, असे दिवे यांनी तडस यांच्याकडे पाहुन स्पष्ट केले व आज अधिकृत घोषणा तांत्रिक कारणास्तव करता येणार नसल्याचे नमूद केले.

वर्धा लोकसभा मतदारसंघात १ हजार ९९५ बुथ समित्या तयार असून त्यावर ५४० शक्तिप्रमुखांचे नियंत्रण राहणार आहे. तेली-कुणबी वादाविषयी प्रश्न उपस्थित झाल्यावर दिवे म्हणाले की तो पक्षीय व्यासपीठावर उपस्थित झालेला वाद नसल्याने उमेदवारीवर त्याचा फरक पडणार नाही. दत्ता मेघे यांच्या आजच्या अनुपस्थितीवर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. मात्र, ते निवडणूक समितीत सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.