News Flash

निर्माल्याच्या योग्य विल्हेवाटीचा नावरेकर कुटुंबाचा उपक्रम

१४०० किलो पाने, फुले, पत्री.. १११ किलो फळे.. ८४ किलो अन्न.. ही एखाद्या पूजेच्या पूर्वतयारीची यादी नाही तर ती पूजेमुळे नदीमध्ये विसर्जित होऊ शकतील अशा

| September 20, 2013 12:18 pm

१४०० किलो पाने, फुले, पत्री.. १११ किलो फळे.. ८४ किलो अन्न.. ही एखाद्या पूजेच्या पूर्वतयारीची यादी नाही तर ती पूजेमुळे नदीमध्ये विसर्जित होऊ शकतील अशा पदार्थाची आहे. दहा दिवसानंतर भाविकांचा निरोप घेणाऱ्या गणरायाच्या मूर्तीबरोबर गणेशभक्त नदीत कशाकशाचे विसर्जन करतात याची ही केवळ झलक येथील निर्मलग्रामच्या आवारात पाहावयास मिळाली. संभाव्य जल प्रदूषण रोखण्यासाठी निर्मलग्राम केंद्राच्यावतीने हे निर्माल्य संकलीत करण्यात आले. त्याची वर्गवारी करून अतिशय योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा आदर्श या केंद्राने सर्वासमोर ठेवला आहे.
स्वच्छता व आरोग्य या क्षेत्रात काम करणारे नावरेकर कुटुंब नाशिकमध्ये काही वर्षांपासून गणेश विसर्जनाच्या दिवशी एक आगळा उपक्रम हाती घेतात. शहरातील गणेश मूर्ती ज्या मार्गाने जातात, त्या मार्गावर अर्थात गंगापूर गावालगत निर्मलग्राम केंद्र व घर आहे. विसर्जनाची लगबग सुरू झाली की, त्यांच्या कुटुंबापैकी किंवा निर्माल्य संकलन करणाऱ्या चमूपैकी काही सदस्य रस्त्यावर उभे राहून जाणाऱ्या वाहनांना थांबवून निर्माल्य आपल्याकडे जमा करण्याची विनंती करतात. गोदावरीचे प्रदूषण रोखण्याच्या हेतूने पाच वर्षांपूर्वी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलनाची मोहीम महापालिकेसह विविध संस्था हाती घेतात. पण, त्या निर्माल्याचे पुढे काय होते, हे कळत नाही. नावरेकरांच्या निर्मल ग्राम केंद्रात संकलित झालेल्या निर्माल्याची प्रथम व्यवस्थित वर्गवारी केली जाते. मग, योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. विसर्जनापूर्वी केंद्राच्या दाराशी भव्य मंडप उभारून स्वयंसेवक सावलीत बसून वर्गवारीचे काम करतात. निर्माल्य गोळा करण्यासाठी गोणपाट व बांबूच्या पट्टय़ांची खास व्यवस्था केली जाते. चार-चार स्वयंसेवकांचा गट आलेल्या निर्माल्याचे वर्गीकरण करतात. प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या पोत्यांमध्ये टाकतात. त्यात सुपाऱ्या, बदाम, नारळ, वस्त्र, कापूर, उदबत्त्या इथपासून ते मोदक, पुरणपोळ्या, घरातील देवाच्या जुन्या प्रतिमा, मूर्ती या व अशा असंख्य गोष्टींचा समावेश असतो. वर्गवारी करून समोर येणाऱ्या निर्माल्याचा उपयोग खत करण्यासाठी नावरेकर करतात. सगळे अन्न एका खड्डय़ात भरून ते बायोगॅस प्रकल्पाला जोडले जाते. निर्माल्यातील फळे कापून झाडांमध्ये टाकली जातात. धान्य धुवून कोरडे करून त्याचे पीठ तयार करून गाईला दिले जाते. सर्व प्लास्टिक पिशव्या (गेल्या वर्षी ६६ किलो) एकत्र करून कचरा वेचणाऱ्या महिलांकडे दिल्या जातात. खोबऱ्याच्या वाटय़ावर प्रक्रिया करून त्याचे तेल काढून ते विकण्या इतपत चिकाटीने हे काम नलिनीताई, श्रीकांत व त्यांची पत्नी संध्याताईसह त्यांची पुढील पिढी मुक्ता व ऋताही करतात. नावरेकरांपासून प्रेरणा घेऊन नाशिकमधील आणखी एका गटाने यंदा अशाप्रकारे निर्माल्य संकलन करून त्यांची पोती निर्मलग्राममध्ये आणली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:18 pm

Web Title: narvekar family launch campaign for ganesh waste articles
Next Stories
1 नक्षलसमर्थक प्राध्यापकासाठी विद्यार्थी संघटनांचे साकडे
2 वीज दरवाढीविरोधात २४ ला मुंबईत बैठक
3 विसर्जनप्रसंगी उत्तर महाराष्ट्रात सहा जणांचा बुडून मृत्यू
Just Now!
X