गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली नाशिक-पुणे विमानसेवा ही विमानसेवा रविवारी(दि.२७) अखेर सुरू झाली आहे. एअर इंडीयाची उपकंपनी असलेल्या ‘अलायन्स एअर’व्दारे २७ ऑक्टोबरपासून म्हणजेच लक्ष्मीपूजनपासून ही सेवा सुरू झाली. नाशिकच्या ओझर विमानतळाहून पुण्यासाठी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या विमानाने उड्डाण घेतलं. यावेळी विमानात १५ प्रवासी होते. तर परतीच्या प्रवासावेळी ३८ जणांनी प्रवास केल्याची माहिती ‘अलायन्स एअर’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हिटी ‘उडान’ योजनेंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ७० आसनी या विमानाच्या तिकीटाचे दर साडेतीन हजार ते चार हजार रुपयांदरम्यान ठरवण्यात आले आहेत. दिवाळीनंतर तिकीटाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याअगोदर डिसेंबर २०१७ मध्ये नाशिक-पुणे ही विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने सुरू केली होती. या सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता; पण एअर डेक्कन कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर ही सेवा बंद केली. त्यानंतर दोन वर्षांनंतर खंडित झालेली ही विमानसेवा सुरू करण्यासाठी अलायन्स एअरने हवाई वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा आता सुरू होत आहे. नाशिक-पुणे दरम्यान रेल्वेमार्ग नसल्यामुळे नाशिक आणि पुण्याच्या नागरिकांना या विमानसेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.