भाजपाचे माजी आमदार आणि नाशिकमधील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार बाळासाहेब सानप यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांनी मुंबई येथे ‘मातोश्री’ गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश केला. सानप यांनी पंधरवडय़ात भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना असे तिहेरी चक्र पूर्ण केलं आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेमधून भाजपामध्ये आलेल्या राहुल ढिकले यांच्याकडून सानप यांना पराभव स्वीकारावा लागला.

सानप हे भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष असून नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर लगोलग ते राष्ट्रवादीचे उमेदवार झाले होते. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.

बाळासाहेब सानप मागील २२ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होते. महापालिकेवर भाजपाला सत्ता मिळवून देण्यात शहराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले नियोजन महत्त्वपूर्ण ठरले होते. जलसंपदामंत्री आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे अगदी काही दिवसांपर्यंत विश्वासू समजले जात होते. मात्र, सानप आणि महाजन यांच्यात बिनसल्यानंतर त्यांना शहराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. विधानसभा निवडणुकीत सानप यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्या सानप यांनी लगोलग राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली होती. त्यांच्यासाठी मनसेने अशोक मुर्तडक यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले होते. प्रचारादरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतलेली सानप यांची भेटही चांगलीच गाजली.