27 February 2021

News Flash

मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराची राजीनाम्याची तयारी

मराठा आंदोलनाचे स्वरूप तीव्र झाले असून नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहूल आहेर यांनी गुरुवारी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.

डॉ. राहूल आहेर हे नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार

मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आहेर यांनी मराठा आंदोलकांकडे राजीनामा सोपवला असून समाजाला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा, असे त्यांनी म्हटले आहे. वेळप्रसंगी समाजासाठी बलिदान द्यायलाही तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे पश्चिम सिडको विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नाशिकमधील पहिल्या महिला आमदार सीमा हिरे यांनीही आपला राजीनामा आंदोलकांकडे सोपवला आहे.

काकासाहेब शिंदे या आंदोलकाच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलनाचे स्वरूप तीव्र झाले असून नाशिकमधील चांदवड- देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहूल आहेर यांनी गुरुवारी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. ‘मराठा आरक्षणाच्या मागणीला माझे समर्थन असून मी मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा सोपवत आहे. समाजासाठी जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांनी हा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवावा’, असे त्यांनी आंदोलकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आमदार राहूल आहेर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टातून उचित निर्णय मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला हक्क मिळालाच पाहिजे, या समाजाला आंदोलनाची वेळ यावी हे दुर्दैव असून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असेल तर सरकारने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

राहूल आहेर यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्याने भाजपाची नाचक्की झाली आहे. भाजपाकडून आमदार आहेर यांच्या इशाऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश न काढल्याचे कारण देत कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता. मी माझ्या मतदारसंघात हिरो असून दोन वेळा निवडून आलो आहे. त्यामुळे मी दिलेला राजीनामा स्वत:ची प्रतिमा उजळ करण्यासाठी दिलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 2:22 pm

Web Title: nashik bjp mla dr rahul aher offer resignation for maratha reservation demand
Next Stories
1 झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी, मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची भूमिका
2 मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन
3 मुख्यमंत्री बदलले तर सरकारचा पाठिंबा काढू: रवी राणांचा इशारा
Just Now!
X