नाशिकजवळील निफाडमध्ये भारत पेट्रोलियमची डिझेलची पाईपलाईन फुटल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मात्र पाईपलाईनपासून काही अंतरावर खड्डा आढळला असून त्या खड्ड्यात डिझेल होते. त्यामुळे हा डिझेल चोरीचा प्रकार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

निफाडमधील खानगाव येथे रामनाथ जगताप यांच्या शिवारालगत गायरानाची जागा आहे. या भागातून भारत पेट्रोलियमची डिझेलची पाईपलाईन जाते. ही पाईपलाईन गुरुवारी सकाळी फुटली आणि हे डिझेल परिसरात पसरत गेले.  डिझेलची गळती झाल्याने लगतच्या परिसरातील शेतजमिनीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. मनमाड साठवणूक केंद्रात कायम ७ दिवस पुरेल एवढा पेट्रोल व डिझेलचा साठा भरलेला असतो. भारत पेट्रोलियमने तुर्भे (मुंबई) ते पानेवाडी (मनमाड) अशी भूमिगत २५२ किमी लांबीची व १८ इंच व्यासाची पाईपलाईन टाकली आहे. त्यातून दररोज लाखो लिटर पेट्रोल, डिझेल व रॉकेल हे मुंबईहून मनमाडला येते.

पाईपलाईनपासून काही अंतरावर एक खड्डाही आढळला असून या खड्ड्यात डिझेल साठवून ठेवल्याचे समजते. त्यामुळे हा डिझेल चोरीचाही प्रकार असू शकतो, असे सांगितले जाते. निर्जन ठिकाणी जेसीबी यंत्र लावून पाईपलाईनला छिद्र पाडल्याचा संशय आहे. पाईपलाईन फुटल्याचा प्रकार ओ. एफ. सी. केबलच्या संगणकीय प्रणालीमुळे  काही वेळातच उघडकीस आला आणि पुढील अनर्थ टळला. तुर्भे येथून मुळ पुरवठा सुरु असलेल्या डिझेलच्या पाईपलाईनचा वॉल बंद करण्यात आला व त्यावर पुर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. ही पाईपलाईन १८ इंची असल्याने व अतिउच्च दाबाने तेथून इंधन सोडले जात असल्याने १० ते १५ मिनिटांमध्ये लाखो लिटर इंधन वाहून जाण्याचा धोका असतो.

उद्यापर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण
इंधन गळतीची घटना झाल्यानंतर तातडीने सक्षम यंत्रणेमार्फत ती थांबविण्यात आली. पहाटेपर्यंत पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रकल्प प्रमुख डी. एम. पानझाडे यांनी दिली. भारत पेट्रोलियम पानेवाडी प्रकल्पात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा असल्याने इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. टॅंकर्स भरण्याचे काम आजही नियमितपणे सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.