News Flash

उद्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक, प्रशासनाची तयारी पूर्ण

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा तयारी पूर्ण झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीकरिता उद्या जिल्ह्यातील १३६ मतदान केंद्रावर मतदान होणार असून आज दादासाहेब गायकवाड सभागृह येथून मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्र पथक रवाना झाले. निवडणूक निरीक्षक आर. जे. कुलकर्णी आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मतदान साहित्य वितरणाची पाहणी केली. मतदान मुक्त आणि नि:पक्षपातीपणे होईल यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचना कुलकर्णी यांनी केली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी समन्वय साधून काम करून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन केले. निवडणूक कर्मचा-यांची नियुक्ती रँडमायझेशन पद्धतीने करण्यात आली असून त्यांना जबाबदारी सोपविण्यात आलेल्या मतदान केंद्राची माहिती साहित्य वाटपाच्यावेळी देण्यात आली.

मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान कर्मचारी आणि साहित्य पोहोचविण्यासाठी २७ बसेस आणि २५ जीपची सोय करण्यात आली आहे. बागलाण, निफाड आणि मालेगाव तालुक्यासाठी गरजेनुसार अधिक कर्मचारी वर्ग देण्यात आला आहे. साहित्य वितरणापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी सरीता नरके, तहसीलदार गणेश राठोड, शरद घोरपडे यांनी साहित्य वाटप आणि जबाबदा-यांबद्दल माहिती दिली. या मतदानासाठी मतदाराला ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, काँग्रेस आघाडीचे डॉ. तांबे आणि डाव्या आघाडीचे प्रकाश (राजू) देसले या तीन पक्षीय उमेदवारांसह एकूण १७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा काय निकाल लागतो हे येत्या सोमवारी मतमोजणीद्वारे जाहीर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 9:16 pm

Web Title: nashik graduate election r j kulkarni radhakrushnan b
Next Stories
1 सुरेंद्र शेजवळ हत्याप्रकरणातील तीन संशयित अटकेत
2 अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे हटवा, उच्च न्यायालयाचा आदेश
3 भारत-इंग्लंड सामन्यावर सट्टा, सांगोल्यात ७ जणांवर गुन्हा दाखल
Just Now!
X