शहापूरवरून नाशिकमध्ये धडकलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा तडाखा महावितरणच्या यंत्रणेला बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसंच वीजांच्या तारांवर मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने बहुतांश भाग अंधारात बुडाल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे. तसंच सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या मार्गावरही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

नाशिक मार्गे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने वादळ जाण्याचा अंदाज आहे. दुपारच्या तुलनेत त्याची तीव्रता बरीच कमी झाली. वादळी पावसात मात्र महावितरणची यंत्रणा कोलमडल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. तर काही ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला.

निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून संचालक दर्जाचे अधिकारी या घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. नैसर्गिक आपत्तीपासून होणारे नुकसान हे वादळाच्या तीव्रतेवर अवलंबून असून प्रभावित भागांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल, असे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी सांगितले.

गुरूवारी पाणीपुरवठा नाही

तर दुसरीकडे बुधवारी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला. शहरास गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा होतो. दोन्ही ठिकाणचा वीज पुरवठा खबरदारी म्हणून बंद करण्यात आला आहे. यामुळे गुरूवारी सकाळी शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे. तसंच सप्तश्रृंगी घाट रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. परंतु काही वेळातच जेसीबीच्या मदतीने दगड बाजुला हटवून घाट रस्ता सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. यासोबतच वादळामुळे एका पोल्ट्री शेडचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे.