News Flash

नाशिक शहरात आजपासून हेल्मेटसक्ती, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली

नाशिक शहरात आजपासून हेल्मेटसक्ती, विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

शहर परिसरात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन नाशिकमध्ये आज सोमवारपासून पुन्हा एकदा हेल्मेटसक्तीचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गेल्या आठवड्यात याबाबत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली होती. १३ मे म्हणजे आजपासून ही हेल्मेटसक्ती अंमलात आली असून शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस नियमाची काटेकोरपणे अंमलबाजवणी करत आहेत. नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीसह बेशिस्त दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

शहरात वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. एप्रिलपर्यंत रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये ६३ जणांचा मृत्यू झाला, ८८ गंभीर तसेच ३१ किरकोळ अपघातात १८३ जण जखमी झाले. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा अपघाताचे प्रमाण काही अंशी कमी असले तरी ते नियंत्रणात आणण्यासाठी शहर वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस सक्रिय झाले आहेत.

अपघाताच्या कारणांचा विचार केला तर विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, विनासीटबेल्ट चारचाकी चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी कारणे समोर येत आहेत. दुचाकी अपघातात ३८ जणांचा मृत्यू झाला. त्यात ३५ चालकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. चारचाकी चालकांचा अपघातात मृत्यू झाला. एकानेही सीटबेल्ट लावलेला नव्हता. चुकीच्या दिशेने गाडी नेल्याने अपघात झाले आहेत. याशिवाय अल्पवयीन वाहनचालक आणि त्यांच्या पालकांवरही मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्याचे नियोजन आहे.

विनापरवाना वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन करणे, एकेरी वाहतुकीच्या मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक तसेच क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करत असेल आणि नियमांचे उल्लंघन करत अपघाती मृत्यू झाला, तर वाहनचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याचा परवाना निलंबनाची कारवाई करणात येईल. याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2019 11:23 am

Web Title: nashik makes helmet compulsory city police commissioner vishwas nangare patils decision
Next Stories
1 हवाई दलात २८ वैमानिकांची तुकडी दाखल
2 पाणी टँकरवर जीपीएसद्वारे नियंत्रण
3 लष्कराच्या गाई पशुसंवर्धन विभागाकडे 
Just Now!
X