येवला तालुक्यातील स्वाईनग्रस्त रुग्णाचा शनिवारी येथे उपचार सुरू असताना  मृत्यू झाला.
बाजीराव गोकुळ चव्हाण (४५) असे या रुग्णाचे नाव आहे.  धनकवडी गावातील रहिवासी असलेल्या चव्हाण यांना ५ सप्टेंबर रोजी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घसा खवखवणे, ताप, खोकला व अंगदुखी अशी स्वाईन फ्लूची लक्षणे दिसत असल्याने त्यांच्यावर तातडीने त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले.  दरम्यानच्या काळात थुंकीचे नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालावरून चव्हाण यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी दिली. टॅमी फ्लू व तत्सम औषधांद्वारे उपचार सुरू असताना शनिवारी चव्हाण यांचा मृत्यू झाला.