संदीप आचार्य

नाशिक येथील झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांमधील ऑक्सिजन साठवणूक टाक्या तसेच व्यवस्थेचे तात्काळ ऑडिट करण्यात यावे अशी मागणी राज्य करोना कृती दलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांची ऑक्सिजन पुरवठादारांकडून होत असलेली छळवणूक व त्यातून सुरु झालेला ऑक्सिजन माफिया रोखण्यात यावा, असेही कृती दलाचे डॉक्टर तसेच काही खासगी रुग्णालयांनी अर्जव केले आहे.

नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात सुमारे दीड महिन्यांपूर्वी भाडे तत्वावर ऑक्सिजन साठवणूक टाकी बसविण्यात आली होती. या टाकीतून होणाऱ्या पुरवठ्यात गळती होऊन ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी हा विषय एकट्या झाकिर हुसेन रुग्णालयाचा नसून करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारे ऑक्सिजन साठवणूक टाक्या आहेत त्या सर्वच रुग्णालयांचा असल्याचे राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढू लागली. यातील बहुतेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने करोना रुग्णालयात रुपांतर केलेल्या बहुतेक रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक टाक्या बसवायला सुरुवात केली. अनेक रुग्णालयांनी आपली क्षमता दुप्पट केली. या सर्वांत ऑक्सिजन टाक्यांतून अथवा रुग्णालयात या टाक्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेताना गळती झाल्यास ती तात्काळ रोखणे तसेच तोपर्यंत रुग्णांच्या ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था केली आहे अथवा नाही, याची कोणतीच ठोस माहिती आज राज्याची आरोग्य यंत्रणा तसेच महापालिकांकडे नसल्याचे नाशिक दुर्घटनेतून अधोरेखित होत असल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, तर नाशिक दुर्घटनेमुळे राज्यातील सर्वच रुग्णालयातील ऑक्सिजन साठवणूक व्यवस्थेचे ऑडिट झाले पाहिजे, अशी भूमिका डॉ. संजय ओक यांनी मांडली. कृती दलाने तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : नेमकं झालं काय? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले…

करोना रुग्ण वेगाने वाढल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची ऑक्सिजनची गरजही वाढली. राज्यात १२०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. ते सर्वच्या सर्व वैद्यकीय कारणांसाठी वापरण्याचा आदेश राज्य शासनाने देऊनही अजून ५०० ते ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. आज राज्यात ६० ते ६५ हजार करोना बाधित रोज आढळत असून ही संख्या वाढल्यास आगामी काळात दोन हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागू शकते असे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वेच्या माध्यमातून काही राज्यातून ऑक्सिजन मागविण्यात येत असला तरी बहुतेक ऑक्सिजन हा महापालिका अंतर्गत येणारी रुग्णालये तसेच आरोग्य विभागाच्या रुग्णालयांना प्रामुख्याने केला जातो. या ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थेवर सध्या शासकीय व्यवस्थेचे नियंत्रण असून काही जिल्ह्यात ऑक्सिजनची पळवापळवी जिल्हाधिकारी स्तरावर होत आहेत. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याची गंभीर दखल घेऊन ऑक्सिजन पळवापळवी न करण्याची तंबी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका रुग्णालयातील १६८ रुग्णांना ऑक्सिजन संपण्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रात्रीत पालिकेच्या अन्य रुग्णालयात हलविण्याची वेळ आली होती.

या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांची परिस्थिती फारच दयनीय झाली आहे. काही खाजगी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन माफियांचा सामना करावा लागत आहे. खासगी रुग्णालयांना पुरवठा दारांकडून सध्या दुप्पट दराने ऑक्सिजन पुरवठा केला जातो. हा पुरवठाही सर्वस्वी पुरवठादरांच्या मेहेरबानीवर अवलंबून असतो. एकीकडे शासकीय यंत्रणेलाच ऑक्सिजन मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना आमच्या तक्रारीची दखल कोण घेणार? असा सवाल या डॉक्टरांनी केला. मोठे ऑक्सिजन सिलेंडर जे कालपर्यंत सहा हजार रुपयांना मिळायचे त्यासाठी आज १० हजार रुपये मोजावे लागतात तर मायक्रो सिलेंडर जो १० हजार रुपयांना मिळायचा त्याला २० हजार रुपये द्यावे लागतात. याशिवाय संबंधितांना चिरीमिरी द्यावी लागते ती वेगळी अशी खंत खासगी रुग्णालयांकडून व्यक्त केली जाते. मात्र यातील एकाही रुग्णालयांचे प्रतिनिधी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. कारण उघडपणे बोलल्यास ऑक्सिजन माफिया त्रास देतील ही भीती त्यांना आहे. राज्य कृती दलाच्या डॉक्टरांनी हा विषय त्यांच्या व्यासपीठावर घेतला असून लवकरच कृती दलाच्या माध्यमातून शासनाकडे याबाबत कारवाईसाठी शिफारस केली जाईल, असे कृती दलाच्या एका सदस्याने सांगितले.

मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी…; मुख्यमंत्र्यांचा भावनिक संदेश

दरम्यान, महापालिका रुग्णालयात जिथे मोठ्या संख्येने रुग्ण ऑक्सिजनवर असतात तेथे नेमकी काय काळजी घेतली जाते याबाबत केईएमचे माजी अधिष्ठाता व कृती दलाचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांना विचारले असता, केईएम रुग्णालयात ऑक्सिजन टँकची नियमित तपासणी करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी असतात. शिवाय जम्बो सिलेंडर व छोट्या ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेसा साठा असतो. मुळात कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये बॅकअप व्यवस्था असणे अपेक्षित असते, तशी ती केईएममध्ये आहे. शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, पालिकेच्या सर्वच मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक टाक्यांच्या नियमित तपासणीसाठी पूर्णवेळ तंत्रज्ञ नियुक्त केलेले आहेत. ते चोवीस तास ऑक्सिजनच्या वापरावर लक्ष ठेवून असतात. कोठेही गळती झाली की तात्काळ यंत्रणा ती दुरुस्त करते. शिवाय मोठ्या सिलिंडरचा राखीव साठा रुग्णालयात असल्याने अडचण येणार नाही, असे डॉ मोहन जोशी यांनी सांगितले. त्यामुळेच उपनगरीय रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपताच तात्काळ तेथील रुग्णांची पालिकेच्या अन्य रुग्णालयात व्यवस्था करता आली. अर्थात तो विषय रुग्णसंख्या जास्त आणि पुरवठादारांकडून ऑक्सिजन पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे उद्भवला होता, असेही डॉ जोशी म्हणाले. तथापि नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांतील ऑक्सिजन साठवणूक व्यवस्थेची सखोल तपासणी होणे गरजेचे असल्याचे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.