रविवार कारंजा परिसरात फुलेनगर येथील काही गुंडांनी भररस्त्यात धारदार शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एका जागरूक नागरिकाने याबाबत हटकल्यानंतर गुंडांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली.
फुलेनगर येथील तीन ते चार गुंड दिंडोरी नाका, रामवाडी, घारपुरे घाट यामार्गे रविवार कारंजा येथे आले. हे गुंड दुचाकीवरून जात असताना कोयत्यासारखे शस्त्र हवेत फिरवत होते. मध्यरात्रीच्या सुमारास या परिसरात त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

या भागातून जात असताना राजेंद्र लक्ष्मण काशिद यांनी (वय ४७, रा. सीतागुंफा) संबंधितांना कोयता का फिरविता, असे विचारले असता गुंड दुचाकीवरून उतरले व काशिद यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. काशिद यांनी डावा हात संरक्षणासाठी डोक्यावर घेतल्याने कोयत्याचा वार त्यांच्या हाताला लागला. यामुळे ते गंभीर जखमी झाले.
त्यांच्या हातावरील जखम पाहून गुंडांनी तेथून पळ काढला. जखमी काशिद यांना बघून आसपासचे नागरिक तेथे आले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. काशिद यांना पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
काशिद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित गुंडांवर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलिसांनी दाखल केला आहे.
या घटनेबाबत वेगाने शोधमोहीम राबवत पोलिसांनी चौघा संशयितांपैकी किरण कोकाटे यास फुलेनगर परिसरातून अटक केली. मात्र त्याचे सर्व साथीदार फरार झाले आहेत. या साथीदारांची ओळख पटली असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे कोल्हे यांनी यावेळी सांगितले.