नाशिक रोड भागात सोमवारी मध्यरात्री झालेल्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक युवकांशी झालेल्या वादाचा बदला घेण्याबरोबर परिसरात दहशत पसरविण्याच्या उद्देशाने या संशयितांनी दारूच्या नशेत वाहनांची जाळपोळ केली आणि नंतर ते इगतपुरी व मनमाड येथे गायब झाले. नाशिक रोड परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने टोळक्याने सोमवारी मध्यरात्री नाशिक रोड ते सिन्नर फाटा परिसरातील चेहडी, जुना ओढा रोड परिसरात अर्धा ते पाऊस तास धुमाकूळ घालत वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी, मालमोटार, टेम्पो, रिक्षा वाहने पेटवून दिली. वाहन जाळपोळीच्या सत्रामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या रात्रीपासून तीन युवक गायब असल्याचे निदर्शनास आले. मग त्या दिशेने तपास केला असता स्थानिक युवकांशी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी दारूच्या नशेत या युवकांनी वाहने पेटवून दिल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. वाहनांची जाळपोळ केल्यावर हे युवक सकाळपर्यंत नाशिक रोड रेल्वे स्थानकात थांबले. मंगळवारी सकाळी ते मनमाड व इगतपुरीला निघून गेले. तेथून परतल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची नावे अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत.